भारतीय कृषी अनुसंधान परिषदे (आयसीएआर)च्या अखत्यारीतील केंद्रीय समुद्रीय मत्स्यकीय संस्था (सीएमएफआरआय) आता विषुववृत्तीय सागरी मत्स्य प्रजातींबाबत संशोधन करणारी संस्था म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली आहे. तिचे मुख्य कार्यालय केरळमधील कोची येथे असून भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व महत्त्वाच्या मासेमारी बंदरांच्या ठिकाणी जसे वेरावळ, मुंबई, मंगलोर, त्रिवेंद्रम, चेन्नई, रामेश्वरम, तुतीकोरिन, विशाखापट्टणम, पुरी, अंदमान, लक्षद्वीप इत्यादी संशोधन उपकेंद्रे आहेत. या संस्थेत सुरुवातीला मत्स्योत्पादनाचे प्रमाण, माशांचे आणि इतर खाद्य सागरी जीवांचे वर्गीकरण, माशांच्या प्रजातींचा जैव-संपत्तीच्या दृष्टिकोनातून अभ्यास, मासेमारीची साधने, अशा बाबींचा अभ्यास केला जात असे. नंतरच्या कालखंडात शाश्वत मासेमारी, मत्स्यशेती, माशांपासून निरनिराळी उत्पादने तयार करणे असे विषय हाताळले जातात.

हेही वाचा >>> कुतूहल : नळ आणि माकूळ

मत्स्योत्पादनाच्या सांख्यिकीशास्त्राच्या आधारे ‘विभागनिहाय स्वैर नमुना चाचणी पद्धती’ वापरून संपूर्ण आठ हजार किमी लांब किनारपट्टीवरील मासेमारीचे विश्लेषण करण्याचे विशेष योगदान सीएमएफआरआयच्या मत्स्यशास्त्रज्ञांनी दिले आहे. या प्रयत्नांनी राष्ट्रीय सागरी मत्स्योत्पादन माहितीचा साठा तयार करण्यात आला आहे. भारतीय किनाऱ्याने असणाऱ्या सर्व राज्यांतील जवळपास हजार मत्स्य प्रजातींची माहिती संस्थेत उपलब्ध आहे. पारंपरिक मासेमारी ही एका प्रमाणापलीकडे उत्पादन देऊ शकत नाही हे जाणवल्यामुळे १९७० च्या दशकानंतर सागरकिनारी करावयाची मत्स्यशेती आणि समुद्रात पिंजरे टाकून करण्यात येणारी मत्स्यशेती याचे तंत्रज्ञान सीएमएफआरआयने विकसित केले. कोळंबी, कालवे, तिसऱ्या, शिणाणे, सी-विड, आणि मोती देणारी कालवं यांच्या उत्पादनावर भर देण्यात आला. यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी मत्स्यशेतीतील एम.एस्सी. पदवी अभ्यासक्रम आणि पीएच. डी. करण्याच्या सुविधा संस्थेत उपलब्ध करून देण्यात आल्या.

हेही वाचा >>> कुतूहल: हुशार खेकडा!

माशांची पैदास करावयाच्या नव्या पद्धती, जैवतंत्रज्ञान आणि जैवविविधता, मत्स्यव्यवसायाचे नियमन, सागरी किनारा असणाऱ्या प्रत्येक राज्यासाठी निरनिराळे विकास आराखडे, सागरी अधिवासावर आणि मच्छीमारांच्या जीवनावर हवामान बदलामुळे होणारे परिणाम, असे अनेक विषय हाताळले जातात. प्रयोगशाळेत विकसित होणारे तंत्रज्ञान स्थानिक मच्छीमार समाजापर्यंत पोहोचवले जाते. मोबाइल फोनचा वापर करून मत्स्यसाठय़ाची माहिती देण्याचे प्रयोग एम. कृषी या नावाने केले जातात. सागर जैवतंत्रज्ञान हा विषय शिकण्याच्या संधी सीएमएफआरआयमुळे शक्य झाल्या आहेत. 

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

 मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org