कुतूहल: आंतरराष्ट्रीय सील दिन

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या माणसाच्या हव्यासामुळे आणि निसर्गावरील अतिक्रमणामुळे अनेक सजीव लुप्त होऊ लागले आहेत.

seal
आंतरराष्ट्रीय सील दिन

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या माणसाच्या हव्यासामुळे आणि निसर्गावरील अतिक्रमणामुळे अनेक सजीव लुप्त होऊ लागले आहेत. अशाच एक दुर्मीळ होत चाललेल्या सागरी सस्तन प्राण्याच्या प्रजातीकडे म्हणजेच सीलकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणाबाबत आपण सजग बनावे म्हणून २२ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय सील दिन’ म्हणून १९८२ पासून साजरा केला जातो.

हात आणि पाय वल्ह्यासारखे असणाऱ्या पिन्नीपीडिया या उपगणातील सील हा सागरी सस्तनी प्राणी आहे. हत्तीसारखे सुळे असणारा वॉलरस, बाह्यकर्ण असणारा समुद्रसिंह (सी लायन) हे याचे जवळचे भाऊबंद. यांनाही सामान्य भाषेत सील म्हटले जात असले तरी खरा सील या दोघांपेक्षा बऱ्यापैकी शांत प्राणी आहे. याचे अग्रपाद मागच्या बाजूला वळलेले असल्यामुळे जमिनीवर चालण्यासाठी त्यांचा त्याला फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच चालताना तो पोटावर घसरत, लोळत पुढे सरकतो. पाण्यात मात्र या वल्ह्यांसारख्या पायांच्या मदतीने तो आपल्या भाऊबंदांपेक्षा बराच वेळ आणि खोल पाण्यातही खूप छान पोहू शकतो. दृष्टी आणि वासाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या सीलला आपल्या फेंदारलेल्या मिश्यांच्या मदतीने अगदी गढूळ पाण्यातही भक्ष्य अचूक हेरता येते. मुख्यत: पाण्यात राहत असले तरी प्रजननासाठी आणि पिल्लांना जन्म द्यायला यांना जमिनीवर यावे लागतेच. पाण्यावर पाय आपटून किंवा घशातून खोल आवाजात गुरगुरल्यासारखा आवाज काढून हे सील एकमेकांशी संवादसुद्धा साधतात.

मुख्यत्वे दक्षिण आणि उत्तर ध्रुवाजवळ सापडत असले तरी, जगातील बहुतांश खंडांमध्ये थंड पाण्याच्या जवळ सीलची वस्ती असते. अगदी भल्यामोठय़ा म्हणजेच जवळपास चार हजार किलो वजनाच्या हत्ती सीलपासून ते अगदी लहानशा ४५ किलो वजनाच्या गोडय़ा पाण्यातील बाइकल सीलपर्यंत यांच्या साधारण ३३ प्रजाती अद्याप तरी अस्तित्वात आहेत. थंड तापमानामध्ये संरक्षण व्हावे आणि अनेक दिवस अन्नाशिवाय जगता यावे म्हणून यांच्या त्वचेखाली चरबीचा जाड थर असतो. या चरबीसाठी, मांस खाण्यासाठी, हाडे आणि कातडी मिळवण्यासाठी यांना मोठय़ा प्रमाणात मारले जाते. माशांच्या जाळय़ात अडकून आणि परिसंस्थेच्या विनाशामुळे, बर्फ वितळत चालल्यामुळे होणारे मृत्यू वेगळेच. सीलसारख्या प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत, त्यांच्याविषयी अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून २२ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय सील दिन’ निसर्ग संवर्धनाचा संदेश देतो.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 01:10 IST
Next Story
कुतूहल: समुद्रतळाच्या अभ्यासाची साधने
Exit mobile version