डॉ. श्वेता चिटणीस, मराठी विज्ञान परिषद
नदीच्या पाण्यासोबत वाहून आलेला गाळ, नदी सागराला मिळताना नदीच्या पाण्याला रोखतो. म्हणून अशा खाडीच्या ठिकाणी चिखलयुक्त किनारे तयार होतात. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी मागे हटल्यावर ‘मड-फ्लॅट्स’ दिसतात. मुंबईतील शिवडी, मढ, मार्वे तसेच नवी मुंबईत असे किनारे आहेत.
मातीचे कण खूप सूक्ष्म असतात, त्यामुळे जिथे लाटांचा प्रभाव कमी असतो अशाच ठिकाणी मातीचे किनारे आढळतात. माती व पाणी मिसळून जो चिखल होतो त्यात प्राण्यांना बिळे खोदणे सहज शक्य होते. शिवाय उन्हाच्या तडाख्याने इथला वरचा थर सुकत नाही. समुद्रफुल (सी अॅनिमोन), काही प्रजातीचे मृदुकाय शिंपले, वलयी अॅरेनिकोला यांसारखे प्राणी, संधिपाद कोळंबीची पिल्ले, खेकडय़ांच्या प्रजाती, निवटय़ांसारख्या (मड स्कीपर) काही प्रजातींचे मासे, अशा प्राण्यांनी इथला अधिवास तयार होतो. या अधिवासात भक्ष्य शोधणारे विविध प्रकारचे बगळे, पाणकावळे, खंडय़ा असे पक्षी ओहोटीच्या वेळी दिसतात. रोहित पक्षी, पाणटिवळे, तुतारी व इतर स्थलांतरित पक्षी येथे खूप मोठय़ा संख्येने येतात. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या रोहित पक्ष्यांचे मुख्य खाणे नीलहरित शैवाल या अधिवासात मुबलक मिळते. रोहित पक्ष्यांच्या चोची उथळ पाण्यातून छोटे प्राणी व शैवाल गाळून घेण्यासाठी अनुकूल असतात. या पक्ष्यांचे पाय जाळीदार असतात, जेणेकरून ते उथळ पाण्यात व चिकट मातीत चालू शकतात. येथे जगणाऱ्या पक्ष्यांची शरीररचना चिखलात चालण्यासाठी अनुकूल झालेली असते. अंडय़ांची, लहान पक्ष्यांची शिकार करून जगणारे घार, शिक्रा यांसारखे भक्षक पक्षी इथे आढळतात.
चिकट मातीत राहणाऱ्या काही लहान संधिपाद आणि मृदुकाय प्राण्यांना या स्थिर अधिवासात बिळे खोदण्यासाठी पायासारखे कार्य करणारे अवयव असतात. चिखलयुक्त किनाऱ्यांनी दलदल माजते. अशा ठिकाणी कांदळवने तयार होतात. विविध जलचरांची ही पाळणाघरेच असतात. शिवाय त्यांच्यामुळे किनाऱ्यांचे संरक्षण होते. पुराचे पाणी शोषून घेण्याचे कार्य येथील तिवरांची झाडे व मातीचे किनारे एखाद्या स्पंजप्रमाणे करतात. अशा रीतीने चिखलयुक्त किनारे जैवविविधतेचे महत्त्वाचे अधिवास आहेत. त्यांचे रक्षण करणे अतिशय आवश्यक आहे. जागतिक हवामान बदलामुळे समुद्रजल पातळीत वाढ झाल्याने येथील जैवविविधता नष्ट होऊ शकते. खडकाळ, वाळूचे आणि चिखलयुक्त असे तिन्ही प्रकार एकाच ठिकाणी एकत्रित झालेले आढळतात. अशी ठिकाणे अभ्यासकांना पर्वणी ठरतात.