या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले बेसाल्ट खडकातील आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. हे भारताचे भूशास्त्रीय सांस्कृतिक स्मारक म्हणून जाहीर झाले आहे. हे सरोवर ४९० फूट खोल असून त्याचा व्यास १.२ कि.मी. आहे. या विवराच्या कडेचा व्यास १.८ कि.मी. इतका आहे. या सरोवरातील पाणी मुळात क्षारयुक्त असून त्याचा पीएच स्तर १०.५ इतका आहे. सरोवरात क्षारयुक्त आणि गोड पाणी असे दोन प्रवाह येऊन मिळतात. हे सरोवर ज्वालामुखीमुळे तयार झाले, असाही एक मतप्रवाह आहे. प्ले स्टोसीन युग हे सर्वात अलीकडचे युग समजले जाते, म्हणजे २५,८०,००० ते ११७०० वर्षे. लोणार सरोवराचा कालखंड ५,७६००० अधिक उणे (+ /-)  ४७००० वर्षे इतका निश्चित केला आहे. पाण्याचा रंग बदलल्यामुळे हे सरोवर प्रथमच चर्चेत आले आहे. २०२० साली हा रंगबदल स्पष्ट बघायला मिळाला. नासाने २५ मे रोजी घेतलेल्या चित्रात हिरवे दिसणारे सरोवराचे पाणी १० जून रोजी घेतलेल्या उपग्रह चित्रात मात्र गुलाबी झाल्याचे आढळून आले.

नागपूरच्या ‘नेरी’ आणि पुण्याच्या ‘आघारकर संशोधन संस्था’ यांनी  केलेल्या संशोधनातून असे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत की हा गुलाबी रंग त्या पाण्यात वाढणाऱ्या लवणजलरागी ‘हेलोअर्किबॅक्टेरिया’ या जिवाणूंच्या अस्तित्वामुळे प्राप्त झाला आहे. हेलोअर्किबॅक्टेरिया हे क्षारयुक्त पाण्यात वाढणारे जिवाणू गुलाबी रंगद्रव तयार करतात आणि त्याचा थर पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होतो. हा गुलाबी रंग कायमस्वरूपी टिकत नाही. कालांतराने तो रंगद्रव सरोवराच्या तळाशी बसतो.

नासाच्या म्हणण्यानुसार डूनालिएला सॅलीना (Dunaliella salina) हे एकपेशीय शैवाल सामान्य परिस्थितीत हिरव्या रंगाचे असते. परंतु जेव्हा पाण्यातील क्षार संपृक्त बनतात किंवा पाणी जेव्हा सूर्यप्रकाशात उघडे राहते तेव्हा हे शैवाल कॅरॉटेनॉइड हे संरक्षक रसायन तयार करते. त्यातील बीटा-कॅरोटीन हे गुलाबी रंगाचे असते. अशाच प्रकारची घटना ऑस्ट्रेलिया येथील हिलियर सरोवरातसुद्धा दिसून आली आहे. तिसरी शक्यता अशी की इराणच्या उर्मीया सरोवरात आढळून आले त्यानुसार लोणार सरोवरात घडले असावे. उन्हाळय़ात तापमान  वाढल्यामुळे, बाष्पीभवन झाल्याने व अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढले आणि सरोवर लाल-गुलाबी दिसू लागले.     

 – डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal lonar dam lake geological cultural monument announced done ysh
First published on: 07-04-2022 at 00:02 IST