राष्ट्रीय जनुक कोश हे बीज बँकेचे आधुनिक विज्ञान रूप आहे. बीज बँक ही संपूर्णपणे निसर्गावर आधारित असून तिचे कार्य शेतातून गोळा केलेल्या निवडक निरोगी बियाणांची उपलब्ध वातावरणामध्ये पारंपरिक पद्धतीने साठवण करणे येथपर्यंतच मर्यादित असते. या पद्धतीमध्ये खर्च अपेक्षित नाही. मात्र जनुक कोश ही बीज साठवण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळेत कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजनच्या साहाय्याने विकसित झालेली खर्चीक व्यवस्था आहे. या पद्धतीमध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या दुर्मीळ पारंपरिक पिकांचे बियाणे, त्याचबरोबर पिकांचे कोंब, उती, भ्रूण, बीजांडे इत्यादी घटक पुढील कृषी संवर्धन, विकास, वातावरण बदलास सामोरे जाण्यासाठी वाणांची नवनिर्मिती आणि वाढत्या लोकसंख्येस शाश्वत अन्नसुरक्षा ही उद्दिष्टे समोर ठेवून साठविण्यात येतात. नवी दिल्ली येथे नॅशनल ब्यूरो ऑफ प्लँट जेनेटिक्स रिसोर्सेस ( ठइढॅफ) हा भारत सरकारचा राष्ट्रीय जनुक कोश १९७७ पासून कार्यरत आहे. तिथे वनस्पतींच्या चार लाख प्रजाती त्यांच्या जनुकीय रूपात अतिथंड शीत वातावरणात साठवण्यात आल्या आहेत. द्रवरूप नायट्रोजनमध्ये उणे तापमानास साठवण करण्याच्या या पद्धतीस ‘क्रिप्टोप्रिझव्र्हेशन’ असे म्हणतात आणि ज्या टाकीमध्ये ही साठवण होते त्यास ‘क्रिप्टोटँक’ म्हणतात. राष्ट्रीय जनुक कोश प्रयोगशाळेत असे सहा क्रिप्टोटँक आहेत. या साठवणीमागे आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे एकदा वनस्पती अथवा पारंपरिक पिकाचे वाण कायमचे नष्ट झाले तर जनुक कोशाच्या साहाय्याने त्याची पुन्हा निर्मिती करता येऊ शकते. या कोशाद्वारे नवीन कृषी वाणनिर्मितीसाठी लागणारी जनुके कृषी शास्त्रज्ञांना उपलब्ध करून दिली जातात. संस्थेची स्वत:ची ४० हेक्टर शेतजमीन आहे आणि तिथे विविध प्रयोग केले जातात. त्याचबरोबर संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पारंपरिक बियाणे गोळा करण्यासाठी भारतातील जंगले तसेच दुर्गम भागांना दोन हजार ६०० पेक्षा जास्त भेटी देऊन २.६७ लाख प्रजाती संस्थेत जतन केल्या आहेत. प्रतिवर्षी १० हजार स्थानिक दुर्मीळ प्रजातींचे संकलन करणे आणि त्यामध्ये जंगली प्रजातींना प्राध्यान देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
नवी दिल्लीचा राष्ट्रीय जनुक कोश जगात दुसऱ्या क्रमांकावर असून देशात विविध राज्यांत त्याच्या १२ प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांत तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार स्थानिक वाणांचे जतन केले जाते. संस्थेत परदेशांतून जनुकीय साहित्य आणून त्यांचा स्थानिक वाणांशी संकर करून शेतकऱ्यांना नवीन विकसित वाण दिले जातात, त्याचप्रमाणे आपल्या देशामधील जनुकीय साहित्य इतर देशांनाही देवाण-घेवाण कार्यक्रमातून दिले जाते. अशा देशांची संख्या आता शंभराहून अधिक आहे.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org