महासागर ९० टक्के अतिरिक्त उष्णता शोषतो, तसेच मानवाने सोडलेल्या उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडपैकी एकतृतीयांश स्वत:त साठवतो. परिणामी तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने कमी राहते. पण याचा परिणाम समुद्राच्या परिसंस्थेवर होतो. महासागरातील जैवविविधतेचा नाश होतो, समुद्रजलाचे आम्लीकरण होते आणि सागरात उष्णतेच्या लाटा येतात. या बदलांवर जगभरातील समुद्रशास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यासाठी गेल्या काही वर्षांत विशेष उपकरणे निर्माण करण्यात आली आहेत. हवामानबदलामुळे मानवावर येणाऱ्या संकटांशी सामना करण्यासाठी अशा प्रकारच्या उपकरणांचा फायदा होणार आहे. अमेरिकेतील वूड्सहोल संस्थेचे शास्त्रज्ञ थेट ध्रुवीय समुद्रापासून ते संधिप्रकाशातील खोल सागरात काम करतील अशा उपकरणांचा वापर करून या बदलांवर लक्ष ठेवत आहेत. यातील दोन महत्त्वाची उपकरणे म्हणजे अर्गोफ्लोटस आणि पोलर सेंटीनेल्स.
अर्गोफ्लोटस वापरण्याची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती. याअंतर्गत जगभरातील महासागरात तरंगते रोबो सोडण्यात आले आहेत. सुमारे ३९०० रोबो सतत समुद्राच्या वरच्या थरांतील पाण्याचे तापमान, क्षारतेसारखे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म तपासत असतात. २००० मीटरपेक्षा जास्त खोलीतील तापमानात आणि क्षारतेत काय बदल घडत आहेत, याची माहिती हवामान तज्ज्ञ आणि समुद्रविज्ञान संशोधकांना सतत पाठवली जाते. ही मुक्तपणे तरंगत जाणारी उपकरणे प्रादेशिक आणि जागतिक पातळय़ांवर महासागराचे तापमान, तेथील उष्णता, क्षारता, गोडय़ा पाण्याचे प्रमाण, समुद्राची खोली, प्रवाहांची माहिती, तसेच वरच्या आणि मधल्या थरांचा अभ्यास करतात. समुद्राच्या पृष्ठभागापासून २००० मीटर खोलीपर्यंत अर्गोफ्लोटस स्वत:च वरखाली करू शकतात.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal scientists focus on climate change1 amy
First published on: 01-03-2023 at 00:20 IST