थॉर हायरडाहल हा कृतिशील मानववंशशास्त्रज्ञ तसेच नॉर्वेजियन दर्यावर्दी २८ एप्रिल १९४७ रोजी जीव पणाला लावून दक्षिण अमेरिकेतील पेरूच्या पश्चिम किनाऱ्यावरून प्रशांत महासागरातील पॉलिनेशिया द्वीपसमूहाकडे निघाला. त्याची मोहीम विक्षिप्तपणाची परिसीमा वाटण्याजोगी होती. पाच दणकट, खंबीर मनाच्या सहकाऱ्यांसह थॉरने साडेतीन महिन्यांत अत्याधुनिक उपकरणांशिवाय प्रशांत महासागरातून तराफ्यावरून सात हजार ९६३ किमी अंतर पार केले. थॉरबरोबर त्याचा पाळीव पोपट लोरिटाही होता. एकेकाळी ‘फातु हिवा’ बेटावर थॉर पती-पत्नी वर्षभर राहिले होते. तेथे त्यांना इंका संस्कृतीतील ‘कॉन-टिकी’ हा वीरपुरुष पेरूहून तराफ्याने पॉलिनेशियात पोहोचतो, असे स्पॅनिश ग्रंथांतून आणि ज्येष्ठांकडून समजले होते. प्राचीन काळी केवळ नक्षत्र-निरीक्षणाने अतिविशाल प्रशांत महासागरात नौकानयनपटूंनी दीर्घ समुद्रप्रवास केला होता. आपल्यालाही तसे जमते का, हे थॉरला तपासायचे होते. त्याने इक्वाडोरमधील सुतारांकडून प्राचीन बांधकाम-तंत्राने काटेसावरीसारख्या झाडाच्या ओंडक्यांचा ‘कॉन-टिकी’ हा ३० फुटी हलका, चिवट तराफा मोहिमेसाठी बांधून घेतला. त्यासाठीचा निधी न्यूयॉर्कमधील ‘एक्सप्लोर्स क्लब’ने पुरवला.

जुन्या काळात आकाशातील तारे दाखवतील त्या मार्गाने नाविकांना, अतिविशाल प्रशांत महासागरातून अशक्य वाटणारी अंतरे ओलांडता येत, हे थॉरने सप्रयोग सिद्ध केले. प्रशांत महासागरातील प्रवाह आणि वारे यांची कॉन-टिकीला योग्य दिशेने नेण्यात मदत झाली. दरदिवशी त्यांनी सरासरी ८० किमी मजल मारली. प्रवासात ते थोडे भरकटले, शेवटी ९३ व्या दिवशी त्यांच्यापैकी एक जण डोलकाठीवर पाहात असताना ‘‘किनारा जवळच आहे’’ असे ओरडला. किनाऱ्यावरच्या लोकांनाही एकल तराफ्याचे इतके आश्चर्य वाटले की छोटय़ा होडय़ांतून कोण पाहुणे आलेत हे बघायला ते आले. बेटावरील फ्रेंच रहिवाशांनी सांगितले, ‘‘१५०० वर्षांपूर्वीचे आमचे पूर्वज तराफ्यावरून प्रवास करत, असे आम्ही ऐकले होते. आता प्रत्यक्ष पाहात आहोत!’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्लो विद्यापीठातून प्राणीशास्त्र व भूगोल विषय शिकताना, पदवी न घेताच शिक्षण सोडणाऱ्या या अवलियाने नंतर ‘रा’ या वेताच्या गलबतातून एकेकाळी सुमेरियन गेले होते त्या अटलांटिक महासागरामार्गे सुखरूप जाणे शक्य आहे हे सिद्ध केले. एकेकाळी थॉरच्या कल्पना हास्यास्पद मानणाऱ्यांना त्याने अचंबित केले. मानवी जिद्दीला महासागरही अडथळा नसतो, हे दाखवणारा थॉर, प्राचीन नौकानयनपटूंचा इतिहास जगला. त्याच्या साहसावर आधारित ‘कॉन-टिकी’ पुस्तक आणि अनुबोधपट लोकप्रिय झाले.- अनघा शिराळकर, मराठी विज्ञान परिषद