खोडामध्ये असणाऱ्या वाढचक्रांचा सविस्तर अभ्यास करून भूतकाळातील हवामानविषयक घटनांचा अंदाज सहज बांधता येतो. एका ठरावीक वर्षांतील हवेचा दर्जा कसा होता हेसुद्धा आता वाढचक्रांच्या अभ्यासातून समजू शकते, मात्र यासाठी विज्ञानाची म्हणजेच रसायनशास्त्राची त्याला जोड हवी. अनेक वेळा हवा विषारी वायूबरोबरच सूक्ष्म धातू कणांनीसुद्धा प्रदूषित होते. हवेतील हे धातू कण वृक्षांची पाने त्याचबरोबर मुळांद्वारे आतमध्ये प्रवेश करून वृक्षाच्या इतर भागाबरोबरच वाढचक्रामध्ये जाऊन तेथे कायमचे स्थिरावतात. रसायनशास्त्राच्या मदतीने या धातूंचा शोध घेता येतो आणि त्यावरून त्या काळात हवा कशी होती याची माहितीही मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिली या राष्ट्राची राजधानी असलेल्या ‘सांतीआगो’ या शहरामधील एका उद्यानात असलेल्या प्रचंड मोठय़ा पुरातन देवदार वृक्षावर प्रयोग करताना शास्त्रज्ञांनी त्याच्या खोडाच्या मध्य गाभ्यापासून बाहेरच्या कडेपर्यंत विशिष्ट प्रकारच्या कमी जाडीच्या ड्रिल मशीनद्वारे वाढचक्राचा सलग नमुना घेऊन त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक वर्षीच्या वाढचक्रामधील तांबे, कॅडमिअम आणि शिसे या तीन मूलद्रव्यांचे प्रमाण मोजले. यामध्ये त्यांना १९७३ ते २००८ या साडेतीन दशकांतील या मूलद्रव्यांच्या नोंदी विशेष दखल घेण्यासारख्या वाटल्या. प्रयोगशाळेमधील अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळले की १९७३ मध्ये सांतीआगोच्या हवेमधील प्रदूषके खूपच कमी होती आणि त्यास कारणीभूत होती चिलीमध्ये झालेली लष्करी क्रांती. या काळात तेथील औद्योगिक व्यवहार थंडावले होते आणि म्हणूनच या तीन मूलद्रव्यांचे हवेतील प्रदूषण कमी झाले होते. नंतरच्या काळात सर्व स्थिरस्थावर झाले, औद्योगिक उत्पादनास सुरुवात झाली आणि प्रदूषणात वाढ होऊ लागली. १९९० मध्ये या राष्ट्रात लोकशाहीची स्थापना झाली, नवीन सरकारने प्रदूषणावर आळा घालण्यास सुरुवात केली आणि तो प्रयत्न यशस्वीही झाला म्हणूनच या तीन मूलद्रव्यांचे हवेमधील प्रमाण १९९० आणि त्याच्यापुढे एकदम कमी झाले. यावरून हे सिद्ध होते की वाढचक्रामधील नोंदींना ऐतिहासिक घटनांबरोबरच त्यांचा वायुप्रदूषणाशी असलेला संबंधही कारणीभूत आहे. प्रत्येक वर्षांच्या वाढचक्राची, त्या वर्षांच्या हवेच्या दर्जाशी गणिती सांगड घालण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

पर्यावरण अभ्यासकांना ज्या काळातल्या हवा प्रदूषणाच्या नोंदी उपलब्ध नसतात त्यावेळी वृक्षांच्या वाढचक्रांचा उपयोग करून ही उणीव दूर करता येऊ शकेल. शास्त्रज्ञांच्या मते वाढचक्रांच्या मदतीने फक्त दशकापूर्वीचाच नव्हे तर काही शतकांपूर्वीचा हवामानाचा भूतकाळ गणिती पद्धतीने तपासता येणार आहे.

–  डॉ. नागेश टेकाळ, मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal search revolution growth cycles detailed meteorological phenomena ysh
First published on: 17-08-2022 at 00:02 IST