scorecardresearch

कुतूहल : उष्ण कटिबंधाचे हवामान

युरोप-अमेरिकेहून परतलेले भारतीय नेहमी विचारतात, ‘‘तिकडचे हवामानाचे अंदाज अगदी अचूक असतात, आपल्याकडचे का चुकतात?’’ प्रश्न वाजवी आहे.

युरोप-अमेरिकेहून परतलेले भारतीय नेहमी विचारतात, ‘‘तिकडचे हवामानाचे अंदाज अगदी अचूक असतात, आपल्याकडचे का चुकतात?’’ प्रश्न वाजवी आहे. कटू सत्य हे आहे की, आपला देश पाश्चात्त्य देशांपेक्षा अनेक बाबतीत मागे आहे. १९६९ साली जे दोन जण चंद्रावर उतरले ते अमेरिकन होते. आपल्याला अजून तेथे जायचे आहे. 

पण हवामानशास्त्र याला एक अपवाद आहे. आपले अंदाज चुकण्यामागे जुनाट विज्ञान किंवा अपुरे तंत्रज्ञान ही कारणे नाहीत. १८७५ पासून भारतीय हवामानशास्त्र विभागाचे आधुनिकीकरण सातत्याने होत गेलेले आहे. हवामानाच्या नोंदी आता स्वयंचलित उपकरणांद्वारे रात्रंदिवस केल्या जातात. भारतीय उपग्रह पृथ्वीवरील हवामानाचा अहोरात्र वेध घेतात. डॉपलर रडारचे जाळे देशभर पसरले आहे, ज्यातून ढगांची आणि वादळवाऱ्याची माहिती मिळते. पुण्यातील प्रत्युष नावाचा सुपरकॉम्प्युटर पूर्वानुमान देण्यासाठी वापरला जातो. 

त्रुटी हवामानशास्त्रात नाही. समस्या हवामानाची आहे. पाश्चात्त्य देशांचे हवामान सुलभ, नियमित असते, त्यांच्याकडे मान्सून नाही. आपले जीवन मान्सूनवर निर्भर आहे, ज्याचा पाऊस फक्त चार महिने पडतो. शीत कटिबंधात वारे अव्याहतपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. तेथील ढग उथळ असतात. त्यातून हलका पाऊस पडतो किंवा हिमवृष्टी होते. ते वाऱ्याबरोबर कुठे, कधी पोहोचतील हे निश्चितपणे सांगता येते. उष्ण कटिबंधावर वर्षभर सूर्य तळपतो. जमीन तापते, हवेत आद्र्रता असली तर ढग बनतात. ते उंच वाढतात, दहा-बारा किलोमीटर उंची गाठतात आणि जागीच बरसतात.

तरीसुद्धा भारतातील हवामानाच्या अंदाजांची अचूकता आता वाढली आहे. चक्रीवादळांचे अपेक्षित मार्गक्रमण आणि त्यांची तीव्रता हल्ली आठवडाभर आधी जाहीर केली जाते. त्यानुसार खबरदारीचे उपाय करता येतात, जीवितहानी टाळली जाते. थंडीची किंवा उष्णतेची लाट येण्याची शक्यताही पाच-सहा दिवस आधी वर्तवली जाते आणि ती बहुधा खरी ठरते. मान्सूनचे पूर्वानुमान विविध कालावधीसाठी केले जाते, जे बरोबर असते. महाराष्ट्रासाठी जिल्हावार ढोबळ अंदाज एक-दोन आठवडे आधी सांगितला जातो, ज्याची अचूकता बऱ्यापैकी आहे.

लोकांचा अपेक्षाभंग होतो तो मुख्यत: स्थानिक पावसाविषयी. कारण पावसाच्या वितरणात खूप भिन्नता असते, ज्यामागे भौगोलिक रचना आणि इतर स्थानिक कारणे असतात. म्हणून अमक्या परिसरात किंवा अमक्या शेतावर या तारखेला इतका पाऊस पडेल असे आज तरी ठामपणे सांगता येत नाही. पण तसे प्रयत्न सुरू आहेत आणि ते नक्की सफल होताना दिसतील. 

– डॉ. रंजन केळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal tropical climate weather guess meteorology exceptions insufficient technology ysh

ताज्या बातम्या