डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हसणं’ या कृतीचं वर्णन करायचं झालं तर कसं करता येईल? – चेहऱ्यावरचे असे हावभाव; ज्यात ओठांचे स्नायू दोन्ही टोकांकडे ताणले जातात. ज्यामुळे माणसाच्या मनातला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. हसणाऱ्या माणसाचे डोळे हसतात. त्याचा पूर्ण चेहराच बोलतो. अनोळखी माणसाकडे बघून स्मितहास्य केलं तरी उत्तरादाखल ती व्यक्तीही हसते. आंतरसांस्कृतिक संशोधनांतूनही हे स्पष्ट झालं आहे की, जगभरात कुठेही चालणारी भाषा म्हणजे हास्याची भाषा.

अवघ्या सृष्टीत माणसालाच फक्त हसता येतं. इतर प्राण्यांपैकी काही प्राण्यांना विविध कारणांमुळे आनंद होतो, वेगवेगळ्या पद्धतीने हे प्राणी झालेला आनंद दाखवतातही. पण त्यांना हसता येत नाही.

तीन महिन्यांनंतर छोटी बाळं आईकडे बघून नीट, अगदी डोळ्यातून हसतात. इतरांकडे बघून हसतात, तेव्हा ते मूल हळूहळू सामाजिक होत चाललं आहे, याची ती खूण असते.  लहान मुलं दिवसातून खूप वेळा हसतात. हसतात तेव्हा अगदी खळखळून हसतात. मनापासून हसतात. लहान मुलांच्या तुलनेत मोठी माणसं फार कमी हसतात. अनेकदा माणसांवर गंभीर परिस्थिती ओढवते. कर्ज, कुटुंबातले वाद- चिंता यामुळे त्यांच्यावर ताण येतो. माणसं दु:खात असतात, त्या वेळी आधाराचं स्मितहास्य केलं तरी समोरच्या माणसाच्या मनात आनंदाची भावना निर्माण होते. एक साधंसं हास्य माणसाला खूप काही देतं. आपण हसतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण जातो. नकारात्मक भावना दूर होतात. सेरोटोनिन, एन्डॉर्फिन आणि डोपामाईन ही तीनही आनंद निर्माण करणारी रसायनं निर्माण होतात आणि काही क्षणांतच ती रक्तप्रवाहात उतरतात. यामुळे शरीरभर ही आनंदाची भावना पसरत जाते. एन्डॉर्फिन या रसायनाला तर नैसर्गिक वेदनाशामक म्हणून ओळखलं जातं. हे एन्डॉर्फिन निर्माण करण्याचं काम आपण आनंदी राहून- हसून करू शकतो. शरीरातच तयार झाल्यानं पूर्णत: नैसर्गिक असलेल्या या रसायनाचे कसलेही ‘साइड इफेक्ट’ असण्याची कसलीही शक्यता नाही. या रसायनांचा अतिशय चांगला परिणाम हृदयाची गती आणि रक्तदाब यावर होतो.   हसणं हे अनेकदा उपचारांचं काम करतं ते असं. या हास्योपचारांवर आधारित हास्य क्लब आपल्याला माहीत आहेत. मनापासून हसलो तर रसायनं आपली कामं योग्य बजावतात. या सकारात्मक भावनांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही आपोआपच वाढते. म्हणून हसण्याची ही नैसर्गिक देणगी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laughter a universal language zws
First published on: 22-10-2019 at 00:15 IST