निसर्गात प्रकाश म्हणजे विविध तरंग-लहरींचे मिश्रण असते,  ज्यांच्या तरंग लांबी भिन्न-भिन्न  असतात. एखाद्या वस्तूवरून प्रकाश परावर्तित होताना त्यातील काही तरंग लांबी तुलनेने क्षीण होतात, त्यामुळे वस्तूला विशिष्ट रंग प्राप्त होतो. पण तो रंग ‘दिसतो’ म्हणजे काय होते?

वस्तूपासून दूर जाणारा प्रकाश जेव्हा मानवी डोळय़ांत प्रवेश करतो, तेव्हा डोळय़ांतील अनेक रासायनिक प्रक्रियांनंतर रंग संकेत(code) व एक संदेश तयार होतो. यात ‘अ’ जीवनसत्त्व आणि प्रथिने यांचा मुख्य सहभाग असतो. डोळय़ांपासून हा संदेश ठरावीक मार्गिकेमधून मेंदूच्या बाह्यांग(cortex) या भागात जातो तेथे संदेशाचे पृथक्कीकरण वेगवेगळय़ा भागात होते, व रंगाबद्दलची माहिती पुढे मेंदूच्या खोलवर अध:चेतकामध्ये (deep hypothalamus) जाते. तिथे या माहितीची पडताळणी केली जाते. ही पडताळणी मोठी गमतीशीर प्रक्रिया आहे. आपल्या मेंदूत आपण लहानपणापासून दिवसाच्या प्रकाशात जे पाहिलं आणि ‘याला हा रंग म्हणायचं’ असं जे शिकलो त्यानुसार त्या रंगाची ‘मेमरी फाइल’ तयार झालेली असते. इथे आणखी एक मुद्दा असा की रंगांची ओळख किंवा त्याचे व्यक्तीनुसार नामकरण यावर कुटुंब आणि सभोवतालची माणसे याचा मोठा पगडा असतो. खरे तर रंगाला शास्त्रीय रूप द्यायच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहेच.

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

तर अशा अनेकानेक रंगांच्या फाइल्स आपल्या मेंदूत साठवलेल्या असतात. जगातील सर्वात उत्तम रंग विच्छेदक आपले डोळे आहेत. (म्हणजे मेंदूच म्हणा ना!) ते सहस्रावधी रंग अचूक ओळखतात. आलेला संदेश साठवलेल्या फाइलशी पडताळला जातो; आणि मग मेंदू सांगतो, ‘संदेश या रंगाचा आहे!’ हे सर्व काम सेकंदाच्या काही भागात पूर्ण होते. केवढी मोठी किमया ही!  सारांश हाच की रंगाचे आकलन मानवी मेंदूत होते आणि म्हणूनच ‘माणसाला दिसतो तो रंग’ हीच रंगाची व्याख्या आहे. थोडक्यात म्हणजे ‘रंगाचे ज्ञान व आकलन’ हे तीन गोष्टींवर अवलंबून आहे. १) दृश्य प्रकाश जो रंगीत वस्तूला प्रकाशित करेल. २) स्वत: रंगीत वस्तू, जी येणारा प्रकाश आपल्या रासायनिक घडणीप्रमाणे शोषित करून उर्वरित प्रकाश दूर फेकेल. ३) मानवी डोळा अथवा मानव. या साऱ्यांना मिळून ‘त्रयी’ (triplet) असे संबोधले जाते. रंगाचे शास्त्रशुद्ध सादरीकरण करण्यासाठी येथील प्रत्येक घटक शास्त्रीय पद्धतीने मांडला जातो, ज्यामुळे रंगालाही शास्त्रीय रूप मिळते.

– डॉ. विनीता दि. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org