नवदेशांचा उदयास्त : लिथुआनिया

सध्या हा देश युनो, नाटो, युरोपियन युनियन, युरोझोन, कौन्सिल ऑफ युरोप या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

उत्तर युरोपातील बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवरील तीन बाल्टिक देशांपैकी लिथुआनिया हा एक आहे. लिथुआनियाच्या उत्तरेस लातविया, पूर्व आणि आग्नेयेकडे बेलारूस, दक्षिणेस पोलंड, नैर्ऋत्येकडे रशियाचा कालिनग्राड हा प्रांत आणि पश्चिमेला बाल्टिक समुद्र असे या देशाचे भौगोलिक स्थान आहे. व्हिल्नियस हे या देशाचे राजधानीचे आणि सर्वांत मोठे शहर. ६५ हजार चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेला लिथुआनिया हा बाल्टिक देशांपैकी सर्वाधिक मोठा देश. २८ लाख लोकसंख्येच्या या देशात ९३ टक्के लोक ख्रिस्तीधर्मीय आणि उर्वरित लोक हे कोणताही धर्म न मानणारे आहेत. येथे प्रचलित असलेल्या लिथुनियन भाषेचे संस्कृतशी साम्य आहे. ११ मार्च १९९० रोजी सोव्हिएत युनियनमधून मुक्त होऊन सध्याचा सार्वभौम लिथुआनिया अस्तित्वात आला. सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडून स्वातंत्र्य मिळविणारा लिथुआनिया हा त्या युनियनचा पहिला सदस्य देश होय. सध्या येथे एकल गृह संसदीय प्रजासत्ताक पद्धतीची राजकीय व्यवस्था असून अध्यक्षीय प्रणालीचे सरकार आहे.

सध्या हा देश युनो, नाटो, युरोपियन युनियन, युरोझोन, कौन्सिल ऑफ युरोप या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. युरो हे त्यांचे चलन. मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या लिथुआनियात युरोपियन युनियनच्या सदस्य देशांनी मोठी औद्योगिक गुंतवणूक केलेली आहे. येथील कृषी उत्पादन, प्लास्टिक आणि रासायनिक उत्पादन, यांत्रिक उत्पादन, खनिज उत्पादन आणि लाकूड आणि फर्निचर या उत्पादनांची निर्यात मोठय़ा प्रमाणात रशिया, पोलंड, जर्मनी, स्वीडन आणि युनायटेड किंगडम या देशांना केली जाते. गेल्या सहस्रकाच्या सुरुवातीपासून लिथुआनिया किनारपट्टीच्या परिसरात बाल्टिक वंशाच्या जमाती टोळ्या करून येथे राहत होत्या. १२५३ मध्ये या प्रदेशात बाल्टिक लोकांनी स्वत:चे लिथुनिया किंगडम स्थापन केले आणि पुढे हे राज्य प्रबळ होऊन त्याचा मोठा विस्तार झाला. चौदाव्या शतकात ग्रॅण्ड डची ऑफ लिथुआनिया या राज्याचा विस्तार इतका मोठा झाला की त्या काळात लिथुआनियाशिवाय बेलारूस, युक्रेन, पोलंडचा आणि रशियाचा काही प्रदेश समाविष्ट होता! इ.स. १३८५ मध्ये लिथुआनियाचा राजा जॉगेल याने ख्रिस्ती धर्माचा पुरस्कार करून लिथुआनियन जनतेचे मोठय़ा प्रमाणात धर्मातर केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lithuania country history lithuania country profile zws

Next Story
कुतूहल : कार्यालयाची रचना
ताज्या बातम्या