पृथ्वीच्या तीनचतुर्थाश पृष्ठभागावर पाणी असले, तरी त्यातील जेमतेम एक टक्काच पाणी मानवाला पिण्यायोग्य आहे. एवढे कमी उपलब्ध असलेले पिण्यायोग्य पाणीदेखील आजच्या घडीला निर्मळ राहिलेले नाही. पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्रोत असलेल्या नद्या, विहिरी, भूजल आदी मानवी हस्तक्षेपामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहेत. खरे तर निसर्ग स्वत:च विविध प्रक्रियांद्वारे त्यातील सर्व घटकांचे प्रमाण संतुलित ठेवतो. परंतु मानवाच्या वेगवेगळ्या कृतींमुळे हे संतुलन बिघडते. जेव्हा घातक, विषारी आणि निसर्गात सहसा न आढळणारे पदार्थ या पाण्याच्या विविध स्रोतांमध्ये मिसळतात, तेव्हा हे पाणी प्रदूषित होऊन मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो.

गेल्या काही दशकांपासून शेतीत कृत्रिम खते आणि कीटकनाशके यांच्या वापराचे प्रमाण खूप वाढले. या रासायनिक पदार्थाचे नैसर्गिक विघटन होत नसल्याने, शेतीच्या पाण्याबरोबर किंवा पावसाच्या पाण्याबरोबर ते जमिनीत खोलवर झिरपत राहिले आणि जमिनीखालून वाहणाऱ्या झऱ्यांत, तसेच कूपनलिका वा विहिरीतील पाण्यात मिसळून हे स्रोत प्रदूषित झाले. याव्यतिरिक्त औद्योगिक कंपन्या व कारखान्यांतून बाहेर टाकल्या जाणाऱ्या घातक रसायनांनी युक्त सांडपाणी आणि त्याचप्रमाणे नागरी वसाहतींमधून सोडले जाणारे मानवी मलमूत्राचे प्रमाण अधिक असलेले सांडपाणी कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता तसेच नद्या किंवा आसपासच्या जलाशयांमध्ये सोडल्यास हे जलाशय प्रदूषित होतात. जर जलाशयात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यात जैविक घटक अधिक असतील, तर जलाशयातील जीवसृष्टीवर याचे घातक परिणाम होतात. मानवनिर्मित जलप्रदूषणाचा आणखी एक स्रोत म्हणजे विविध प्रकारची खनिजे मिळवण्यासाठी करण्यात येणारे उत्खनन. यातून निर्माण होणारे जड धातू पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित होते.

अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पांद्वारे मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या सांडपाण्यात काही प्रमाणात किरणोत्सारी मूलद्रव्येदेखील असतात. त्यांचे प्रमाण अतिशय नगण्य असले तरी त्यांच्या किरणोत्सारी गुणधर्मामुळे अशी मूलद्रव्ये जलाशयांमध्ये सोडली गेल्यास तेथील जीवसृष्टीची अपरिमित हानी होते.

पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण पाणीसाठय़ांपैकी जवळपास ९७ टक्के पाणी हे समुद्र आणि महासागरांच्या रूपात आहे. मात्र, सागरी वाहतुकीदरम्यान तेलवाहू जहाजांमधून मानवी निष्काळजीपणामुळे किंवा अपघातामुळे तेलगळती होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. याशिवाय या जलाशयांमध्ये मोठय़ा प्रमाणात जमा होणारा प्लास्टिकचा कचरादेखील अत्यंत धोकादायकरीत्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे.

– चिन्मय सोमाणी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org