यंदाचा हा सागर विज्ञानावरील २५६ वा लेख आहे. कितीही माहिती दिली तरी सागर विज्ञान संपत नाही. सागर अथांग आहे! या कुतूहल सदरात ३६ लेखकांनी भाग घेतला आणि त्यातील १९ लेखकांनी या सदरासाठी प्रथमच लेखन केले. हे या सदराचे १८वे वर्ष दरवर्षी सुमारे ३६ ते ४० लेखक या सदरासाठी लेखन करतात आणि त्यातील २० लेखक नवीन असतात. याचा अर्थ, गेल्या १८ वर्षांत ३६० लेखक या सदराने घडवले, हे या सदराचे फलित आहे. लेखाखाली देण्यात येणाऱ्या ई-मेलवर अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे कळवले. सदरातील माहिती जास्तीत जास्त अचूक असेल, यावर नेहमीच आमचा भर असतो.
हेही वाचा >>> कुतूहल : राष्ट्रीय सागरी उद्याने
मधुकर दीक्षित यांनी भरती-ओहोटी लेखासंदर्भात विचारले होते की भरती-ओहोटीचा मानवी मनावर काय परिणाम होतो? कमकुवत मनाच्या व्यक्तींवर याचा विपरीत परिणाम होतो हे खरे आहे का? पण तो विषय मनोविकारतज्ज्ञांच्या कार्यक्षेत्रातील आहे, त्यामुळे त्यावर या सदरात उत्तर देता येणे शक्य नाही. अशोक पवार (कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, सातारा) यांनी एल निनोसंदर्भात व्यापक स्वरूपात प्रबोधन करण्याबाबत आयोजित ऑनलाइन सभेत चर्चेसाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन ‘एल निनो’ या लेखाच्या लेखिका अदिती जोगळेकर यांना ई-मेलद्वारे केले होते. महाराष्ट्र शासन निर्णय १४/१०/२०२२ नुसार ‘चला जाणू नदीला’ या नदीप्रदूषण, अतिक्रमण व इतर अनुषंगिक विषयांबाबत जनमानसात प्रबोधन घडवून आणण्यासाठीच्या शासन मोहिमेअंतर्गत ही सभा आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा >>> कुतूहल : समुद्र वैज्ञानिक होण्यासाठी..
बुलडाण्याच्या विनय देशपांडे यांनी कळवले की ‘एल निनो व ला निना’ या संकल्पना आणि त्यांचा पावसावर आणि पर्यायाने शेतीवर काय परिणाम होतो, हे चांगले समजले. नागपूरच्या ‘फिशरीज सायन्स कॉलेज’च्या जुई हुक्केरी या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थिनीने मत्स्य विज्ञानात एखाद्या परदेशी विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी चांगले विद्यापीठ
कोणते हे विचारले. ममता वाघ यांना खारफुटी परिसंस्था संवर्धन दिनाचा लेख स्फूर्तीदायक वाटला. या सर्वांना मूळ लेखकांनी उत्तरे पाठवली आहेत.
मराठी विज्ञान परिषद दरवर्षी कुतूहल सदरासाठी नवीन विषय घेते. पुढील वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे विविध पैलू या सदरातून वाचकांपुढे आणण्यात येणार आहेत. सर्व वाचकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा!
– अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org