अ‍ॅलन टयुरिंग (२३ जून १९१२ ते ७ जून १९५४) या ब्रिटिश गणितज्ज्ञाला ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ जनक मानले जाते, कारण त्यांनी सर्वप्रथम या संकल्पनेला मूर्त औपचारिक बैठक दिली. ती त्यांनी १९५० साली ‘माइंड’ या तत्त्वज्ञानविषयक जर्नलमध्ये ‘कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स’ या शोधलेखात मांडली होती.

‘संगणकासारखे यंत्र विचार करू शकेल का?’ या प्रश्नाला थेट उत्तर न देता, यंत्र माणसाइतकेच हुशारीने कृती करू लागल्यास ते बुद्धिमान मानले जावे असे त्यांनी सुचवले. हे तपासण्यासाठी टयुरिंग यांनी एक पद्धत सादर केली, जिला त्यांनी ‘नकलीचा खेळ’ (इमिटेशन गेम) असे संबोधले.

हेही वाचा >>> कुतूहल : मानवाला कृत्रिम बुद्धिमत्ता हवी आहे, कारण..

आता ती ‘टयुरिंग चाचणी’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. तिच्याप्रमाणे फक्त एक लहान झरोका असलेल्या संपूर्ण बंदिस्त खोलीत एक संगणक आणि माणूस उपस्थित आहेत. आपण बाहेरून टेपवर अंकित केलेले प्रश्न त्या झरोक्यातून आता पाठवायचे; त्यांची मिळालेली उत्तरे खोलीतील मनुष्याने दिली की संगणकाने, हे सांगू शकण्यास आपण असमर्थ ठरलो, तर त्या खोलीतील यंत्र बुद्धिमान आहे, असा निष्कर्ष काढता येईल. या चाचणीची विविध रूपांतरे पुढे आली असली तरी, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा पाया टयुरिंग यांच्या सदर पथदर्शी चाचणीमुळे घातला गेला हे जगमान्य आहे.

टयुरिंग यांचा अंदाज होता की, ५० वर्षांनंतर कृत्रिम बुद्धिमत्ता इतकी प्रगत असेल की सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती पाच मिनिटे वरीलप्रमाणे चाचणी घेतल्यास खोलीत यंत्र आहे की मनुष्य हे १०० पैकी ७० वेळा ओळखू शकणार नाहीत. ‘चॅट जीपीटी’ या प्रणालीमुळे आता ती वेळ बहुधा येऊन ठेपली आहे.    

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे आकर्षण!

जर संगणन कार्यासाठी औपचारिक रीत (अल्गोरिदम) मांडणे शक्य असेल तर त्याच्यासाठी ‘वैश्विक गणन यंत्र’ अवश्य तयार करता येईल, असेदेखील टयुरिंग यांनी १९३६ मध्ये गणिती तर्कशास्त्र वापरून सिद्ध केले. अशा संगणकाला ‘टय़ुरिंग मशीन’ म्हणतात. म्हणजेच, आजचा कुठलाही संगणक टयुरिंग मशिनशी अनुरूप (कम्पॅटिबल) आहे. टयुरिंग यांनी पुढे सिद्ध केले, की संगणनेस सुरुवात केलेले टयुरिंग मशीन कधी थांबेल (हॉल्टिंग प्रॉब्लेम) याचे भाकीत आधीच करणारा अल्गोरिदम विकसित करणे शक्य नाही.

१९६६पासून त्यांच्या गौरवार्थ दरवर्षी संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस नोबेल पारितोषिकासमान असणारे ‘अ‍ॅलन एम. टयुरिंग पारितोषिक’ देण्यात येते.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.