कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी रोज नवनव्या बातम्या येतात. उलटसुलट चर्चा झडतात. या क्षेत्रातील तज्ज्ञ आपले विचार मांडतात. तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो की कृत्रिम बुद्धिमत्तेचा एवढा गवगवा का? कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला नक्की का हवी आहे? याला थोडक्यात उत्तर द्यायचे तर ते आहे वेग आणि अचूकता. सध्याच्या वेगवान जीवनशैलीत माणसाच्या क्षमतेला खात्रीलायक मार्गदर्शनाची साथ गरजेची झाली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही गरज भागवू शकते. 

आजच्या जीवनशैलीत पहिला मुद्दा आहे तात्काळ प्रतिसाद मिळण्याचा. हल्ली कोणतीही वस्तू किंवा सेवा कोणत्याही क्षणी उपलब्ध होण्याच्या अपेक्षा वाढत आहेत. घरातला फ्रीज बिघडला तर आपल्याला ताबडतोब तो दुरुस्त करून घ्यायचा असतो. एखाद्या ठिकाणी जायचे ठरवले, की लगेच तिकीट आरक्षित करायचे असते. कोणताही विषय निघाला, की पटकन त्याची माहिती हवी असते. या सगळयात अधिकाधिक स्वयंचलन (ऑटोमेशन) आणून त्वरित प्रतिसाद द्यायचा तर तिथे माणसाच्या जोडीला कृत्रिम बुद्धिमत्ता हवी. कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत मिळाली तर विद्युतपुरवठा, वाहतूक सेवा, मनोरंजनाची साधने खंड न पडता कार्यक्षमतेने सुरू ठेवणे शक्य होते.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे आकर्षण!

दुसरा मुद्दा आहे आज निर्माण होणाऱ्या प्रचंड माहितीचा. माणसे, त्यांच्याकडची मोबाइल फोन आणि टॅबसारखी साधने, लहानमोठे संगणक, त्यांच्यावरून होणारे आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक व्यवहार, औद्योगिक यंत्रणा, सारे मिळून रोज पुष्कळ प्रमाणात माहिती निर्माण करतात. ही माहिती महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वापरायची तर तिचे वेगाने विश्लेषण करणे आवश्यक असते. मग त्यात चक्रीवादळ कुठे आले आहे याचा आडाखा असो, करोनासारखी महासाथ किती वेगाने फैलावत आहे याचा अंदाज असो, एखाद्या आर्थिक व्यवहारात गडबड होते आहे याचा तत्क्षणी मिळणारा इशारा असो, अमुक रस्त्यावर अपघात झाल्याने आपल्या वाहनाच्या मार्गात बदल झाल्याचा संकेत असो, की कोणत्या उत्पादनांना जास्त मागणी आहे, याची ताजी खबर असो.. माहितीचे विश्लेषण वेगाने, काटेकोर आणि दिवसाचे २४ तास न चुकता व्हायला हवे असेल, तर तिथे कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही.

यापलीकडेही अनेक कारणांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक वाटते. गुंतागुंतीच्या यंत्रणांचे व्यवस्थापन करण्यासाठी, माणसाला उमगणार नाही असे आकृतीबंध (पॅटर्न्‍स) ओळखण्यासाठी, अमूर्त संकल्पनांचे आकलन करण्यासाठी, संशोधनात मोठा पल्ला गाठण्यासाठी आणि अन्य कितीतरी कारणांसाठी.. पुढील लेखांमध्ये त्यावर विस्ताराने चर्चा होईल.

– डॉ. मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org