कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समाजमाध्यमातल्या वापराचा एका क्षेत्रावर विलक्षण प्रभाव पडला आहे. ते क्षेत्र म्हणजे- जाहिरात क्षेत्र! समाजमाध्यमांवरच्या जाहिरातींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता इतक्या परिणामकारकपणे वापरली जाते की एक प्रकारचा आभासी भूलभुलैया तयार होतो. आपण त्यात इतके गुंततो की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते.

अनेक जण समाजमाध्यमांवर आपली मते सतत मांडत असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेतली वेगवेगळी ‘मशीन लर्निंग अल्गोरिदम’सारखी साधने वापरून कुणाची काय आवड आहे, हे शोधले जाते. या विश्लेषणानुसार आपल्याला कोणती जाहिरात दाखवायची याचा निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ताच घेते. क्षणार्धात आपली जी आवड आहे त्या संदर्भातल्या जाहिराती आपल्यासमोर फेर धरून नाचू लागतात. याला ‘अॅडव्हर्टाइजमेण्ट मॅनेजमेंट टूल्स’ असे म्हटले जाते. यामुळे ‘मार्केटिंग’ करणाऱ्या कंपन्यांचा प्रचंड फायदा होतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समाजमाध्यमांतल्या वापरामुळे जाहिरात आता ‘वैयक्तिक’ झाली आहे. रेडिओ किंवा टीव्हीवरून प्रसारित होणारी जाहिरात सगळ्यांसाठी एकच असते. पण समाजमाध्यमांवर प्रत्येकाला त्याच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळी जाहिरात दाखवली जाते. इतकेच नाही तर एखादा माणूस फेसबुक आणि ट्विटर (आत्ताचं एक्स) अशी दोन समाजमाध्यमे वापरत असेल तर तो माणूस फेसबुक गंमत म्हणून वापरतो आणि ट्विटर आपले एखाद्या गोष्टीवरील मत मांडण्यासाठी किंवा काही माहिती देण्यासाठी वापरतो. हा सूक्ष्म बदल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कळू शकतो आणि त्या माणसाला या दोन्ही माध्यमांवर निरनिराळ्या जाहिराती दाखवल्या जातात.

आज निरनिराळे ब्रॅण्ड्स समाजमाध्यमांद्वारे लोकांशी जोडले जाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवनवीन युक्त्या-प्रयुक्त्या करत आहेत. चॅट बॉटचा वापर करून ग्राहकाचे आपल्या उत्पादनासंदर्भातील शंकासमाधान क्षणार्धात करणे किंवा एखादा ड्रेस अंगावर कसा दिसेल याची घरबसल्या फोटोवर ट्रायल देणे या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेतल्या प्रगतीमुळे शक्य झाल्या आहेत. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही यावरच्या जाहिरातींमध्ये ही सोय नसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा समाजमाध्यमांवर जसजसा वापर वाढला तसतसा जाहिरात क्षेत्राला एक मोठा धोकाही उत्पन्न झाला आहे. अॅमेझॉनचे सीईओ ‘जेफ बोझेस’ यांच्या मते पूर्वी जर एखादा ग्राहक नाराज झाला तर ते फक्त सहा जणांना कळायचं पण आता ते सहा हजार लोकांना कळते. ग्राहकांना ही ताकद समाजमाध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या जोडीने दिली हे मात्र खरे!