आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र संस्थांच्या संघटनेचे (इंटरनॅशनल युनियन ऑफ मायक्रोबायॉलॉजिकल सोसायटीज् झ्र आययूएमएस) मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आहे. या संघटनेची स्थापना १९२७ साली आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र संस्था (इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मायक्रोबायॉलॉजी) या नावाने झाली. १९६७ साली तिचे रूपांतर सूक्ष्मजीवशास्त्रासंबंधीच्या सर्व संस्थांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत झाले. १९८० साली या संघटनेचे नामांतर ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ मायक्रोबायॉलॉजिकल सोसायटी’ (आययूएमएस) असे होऊन तिला स्वायत्तता प्राप्त झाली. १९८२ साली या संघटनेला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघटनांच्या परिषदेचे सदस्यत्व मिळाले.

आययूएमएस ही आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या (इंडियन सायन्स कौन्सिल) ४० सदस्य संघटनांपैकी एक असून ती एक आंतरराष्ट्रीय बिगरसरकारी संस्था आहे. सूक्ष्मजीवशास्त्रासंबंधीच्या सर्व संस्थांना एकत्र आणून संसर्गजन्य जीवाणूंवर नियंत्रण आणणे, सूक्ष्मजीवांचे वैविध्य टिकवणे, त्यांच्या महत्त्वासंबंधी जनजागृती करणे व यासाठी शाश्वत उपाययोजनांचा जागतिक पातळीवर विकास व प्रचार करणे ही आययूएमएसची मुख्य उद्दिष्टे आहेत.

जीवाणू, बुरशी, विषाणू, अन्नातील सूक्ष्मजीव, वैद्याकीय सूक्ष्मजीव इत्यादींचे निदान करून त्यांचे वर्गीकरण व नामकरण करणे, सूक्ष्मजीवांचे नमुने मिळवणे आणि त्यांचे प्रमाणीकरण करणे तसेच त्यांची माहिती सर्व संबंधित संस्थांना पुरवणे इत्यादींचा आययूएमएसच्या कार्यामध्ये समावेश आहे. ही संघटना सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाला व संशोधनाला जगभर चालना देते, माहितीचे वितरण करते, सभासंमेलने भरवते तसेच अहवाल तयार करण्यासाठी सर्वोतोपरी मदतही करते.

आययूएमएसचे तीन विभाग आहेत. (१) जीवाणूशास्त्र व उपयोजित जीवाणूशास्त्र (२) बुरशीशास्त्र किंवा कवकशास्त्र व पेशीकेंद्रक सूक्ष्मजीवशास्त्र आणि (३) विषाणूशास्त्र. या प्रत्येक विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे.

आययूएमएस तिचे वैज्ञानिक कार्यक्रम सहा विशेष समित्या, नऊ आंतरराष्ट्रीय आयोग आणि दोन आंतरराष्ट्रीय संघराज्ये यांच्या माध्यमांतून आयोजित करते. ३१ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघटना जगभरातील वैज्ञानिकांना एकत्र आणून सूक्ष्मजीवशास्त्रातील विविध विषयांवर सभासंमेलने आयोजित करतात. सध्या ६५ देशांच्या ८८ राष्ट्रीय संस्था आणि १४ सहयोगी सदस्य आहेत. ही संघटना नियतकालिके व बातमीपत्रे प्रसिद्ध करते तसेच मूलभूत आणि उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र व जीवाणूशास्त्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल संशोधकांना आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्रतिनिधींच्या महासभेत प्रदान करते. त्यात मूलभूत सूक्ष्मजीवशास्त्रासाठी स्टुअर्टमड हे परितोषिक, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रासाठी अरिमा परितोषिक आणि जीवाणू शास्त्रासाठी व्हाननील परितोषिक प्रदान करण्यात येते.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org