कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आता स्वयंचलित यंत्रे, यंत्रमानव व मानव यांच्या सहजीवनाचे स्वप्न आपण पाहात आहोत. ते प्रत्यक्षात येण्यासाठी स्वयंचलित यंत्रांमध्ये माणसांचे मन जाणून घेण्याची क्षमता असणे अनिवार्य आहे. मानवाची परिपूर्ण प्रतिकृती असणाऱ्या यंत्रमानवातच नाही तर एखाद्या मर्यादित क्षेत्रात ठरावीकच काम करणाऱ्या स्वयंचलित यंत्रालाही संपर्कात येणाऱ्या माणसांचे मन जाणणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, स्वयंचलित वाहनांमध्ये इतर मानवी वाहनचालकांच्या व रस्त्यातून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या प्रतिक्रिया क्षणार्धात जाणण्याची क्षमता असेल तरच संभाव्य अपघात टाळता येतील. चॅटबॉटसारखे यंत्र- साहाय्यक जर समोरील व्यक्तींची मानसिक स्थिती जाणू शकले तर ते नक्कीच अधिक उपयुक्त ठरेल.

हेही वाचा >>> कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर

या संदर्भात मनाचा सिद्धांत (थिअरी ऑफ माइंड) ही मानसशास्त्रीय संकल्पना तपासली जात आहे. प्रत्येक व्यक्तीची मानसिकता वेगळी असते. तिची प्रत्येक क्रिया-प्रतिक्रिया, मते यामागे तिची स्वत:ची लहानपणापासूनची जडणघडण, वेगवेगळ्या श्रद्धा आणि हेतू कारणीभूत असतात. दुसऱ्याची मानसिकता जाणून घेण्याची क्षमता म्हणजेच ‘‘मनाचा सिद्धांत’’. ही क्षमता मानवामध्ये लहानपणी हळूहळू विकसित होते. लहान मुले बऱ्याचदा आत्मकेंद्रित असतात, कारण त्यांच्यामध्ये ही क्षमता पुरेशी विकसित झालेली नसते. मानवाच्या सामाजिक सहजीवनात मनाच्या सिद्धांताचे फार मोठे स्थान आहे. समाजात वावरताना पावलोपावली आपण समोरच्या माणसाचे मत आणि मन याचा अंदाज क्षणार्धात बांधून आपले निर्णय घेतो. त्यामुळे संघर्ष, वेळेचा अपव्यय आणि संलग्न नुकसान बहुधा टळते.

हेही वाचा >>> कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके

मानवी मन आणि बुद्धिमत्ता हे कोट्यवधी वर्षांच्या नैसर्गिक उत्क्रांतीचे फलित आहे. मानवी मनाची जटिल गुंतागुंत, मानवी बुद्धिमत्तेची कार्यप्रणाली आणि बोधन प्रक्रिया (कॉग्नेटिव्ह प्रोसेस) पूर्णत: जाणून घेणे अजूनही आपल्याला साध्य झालेले नाही. अशा परिस्थितीत मनाचा सिद्धांत अंतर्भूत असणारी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आणणे शक्य आहे का? शक्य असल्यास त्याला किती काळ लागेल? अशा यंत्रांचे मानवी जीवनावर कोणते परिणाम होतील? याबद्दल अनेक परस्पर विरोधी मते मांडली जातात.

परंतु मार्ग कितीही खडतर असला तरी न थांबता समस्येचे छोटे भाग करून त्यांची उत्तरे मिळवत पुढे जाण्याचे प्रयत्न संशोधक करत आहेत. यंत्र शिक्षण (मशीन लर्निंग), सखोल शिक्षण (डीप लर्निंग), रीइन्फोर्समेंट पद्धत, न्युरल नेटवर्किंग अशा विविध पद्धती शोधून संशोधक यंत्रासाठी मनाच्या सिद्धांताच्या दिशेने पुढे जात आहेत. त्या प्रयत्नांबद्दल व त्यातील यशापयशाबद्दल अधिक माहिती आपण पुढील लेखात पाहुया.

– प्रा. माणिक टेंबे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org