जिवाणू, वनस्पतींच्या पेशी किंवा प्राण्यांच्या ऊती या सर्व इतक्या सूक्ष्म आणि पारदर्शक असतात की सूक्ष्मदर्शकाखालीही त्या स्पष्ट दिसत नाहीत! मग यावर उपाय काय? उत्तर आहे ‘अभिरंजनक्रिया’ अर्थात स्टेनिंग.

अभिरंजनक्रियेत सूक्ष्म पेशीअंगकांना रंगद्रव्याच्या साहाय्याने रंगविले जाते. परिणामी त्या अधिक स्पष्ट व ठळक दिसतात. यामुळे निरीक्षण अधिक प्रभावी बनते. अभिरंजनक्रियेत ‘डाय’ किंवा ‘स्टेन’ वापरले जातात. अनेक वेळा त्यांना रंग असेही म्हटले जाते पण त्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे. ‘डाय’ हे सामान्य रंगद्रव्य असून त्याचा वापर कपडे रंगवण्यासाठी, शाईमध्ये किंवा दैनंदिन वस्तूंमध्ये केला जातो. पण सगळे डाय अभिरंजनक्रियेसाठी उपयुक्त नसतात. याच्या उलट, ‘स्टेन’ हे असे डाय की जे पेशींच्या विशिष्ट रचनांशी रासायनिक बंध तयार करून त्या ठळकपणे दर्शवितात म्हणजेच रंगवितात.

सूक्ष्मजीवशास्त्रात, विविध जिवाणू व सूक्ष्मजीव पाहण्यासाठी अभिरंजनक्रिया अनिवार्य आहे. सर्वात प्राथमिक म्हणजे ग्राम स्टेनिंग’ ज्यातक्रिस्टल व्हायोलेट, आयोडिन, सॅफ्रानिन वापरून जिवाणू त्यांच्या पेशीभित्तिकेच्या गुणधर्मावरून ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह गटात विभागले जातात. अॅसिड-फास्ट स्टेनिंग’ (झिल-नीलसन पद्धत) मध्ये कार्बोल फ्युशिन वापरला जातो, हा स्टेन टीबीचे (क्षयाचे) जिवाणू दर्शविण्यासाठी वापरला जातो. वनस्पतीशास्त्रात, अभिरंजनक्रियेचा उपयोग मुख्यत: पेशीभित्ती, लिग्निनयुक्त ऊतक, स्टार्च साठा, गॉलगी बॉडीज अशा रचना ओळखण्यासाठी होतो. प्राणीशास्त्रात ऊतकांचे निरीक्षण करण्यासाठी विशेष अभिरंजनक्रिया वापरली जाते. जिम्साज स्टेन’ रक्तपेशी, मलेरियाचे परजीवी आणि क्रोमोसोम्स दर्शवण्यासाठी वापरले जाते. जिवाणूमध्ये बेलीज पद्धतीने रंगवलेल्या केशाभिका (फ्लाजेला) या गुलाबी रंगाच्या दिसतात. तसेच केंद्रक, पेशीपटल, झलरिका (पिलाय), पास्मिड्स, अशी पेशीअंगके विविध रंगपद्धतींनी रंगवली जातात.

अभिरंजनक्रियेचा वापर हिस्टोपॅथॉलॉजीमध्येही होतो. उदा पिरिऑडिक अॅसिड-शिफ (पीएएस) स्टेन ही पेशींतील कार्बोहायड्रेट्स ओळखण्यासाठी वापरले जाते. याचा उपयोग फंगल इन्फेक्शन, मधुमेह संलग्न मूत्रपिंडाचे विकार आणि यकृताचे विकार यांचे निदान करण्यात होतो. आधुनिक काळात, विशिष्ट रंगाच्या प्रकाशात चमकणाऱ्या फ्लूरोसंट डाय वापरून पेशीतील सूक्ष्मरचना पाहता येते. अभिरंजनक्रियेची अचूकता वाढवण्यासाठी फ्लूरोसंट डाय चिकटवलेल्या प्रतीपिंडाचा (अँटीबॉडी) वापर केला जातो. चाचणी नमुन्यामध्ये विशिष्ट प्रथिनास ही प्रतिपिंडे अचूकपणे चिकटतात व अतिनील किरणांमध्ये प्रतिदीप्ती दर्शवतात. फ्लूरोसेंट डायचा वापर कर्करोग, विषाणूजन्य रोगांचे अचूक निदान करण्यासाठी होतो. या डायमुळे पेशीतील प्रथिनांच्या हालचालींचे निरीक्षणदेखील अगदी सहज करता येते.

डॉ. विनायक पांडुरंग सुतार

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org