वैज्ञानिक आणि प्रौद्याोगिकी संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अखत्यारीत असणारे ‘पेशीकीय व आण्विक जीवशास्त्र केंद्र (सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी-सीसीएमबी)’ हे मूलभूत जीवशास्त्रात संशोधन करणारे भारतीय केंद्र हैदराबाद इथे कार्यरत आहे. १ एप्रिल १९७७ रोजी अंशत: स्वायत्तता असलेली क्षेत्रीय प्रयोगशाळा म्हणून या केंद्राची स्थापना झाली. डॉ. पुष्प मित्र भार्गव हे या केंद्राचे संस्थापक संचालक झाले. स्थापनेच्यावेळी या प्रयोगशाळेत जैवरसायन (बायोकेमिस्ट्री) हा एकमेव विभाग होता. १९८१-८२ या वर्षात या केंद्राला पूर्णपणे विकसित राष्ट्रीय प्रयोगशाळेचा दर्जा प्राप्त झाला. सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त जागेत हे केंद्र २६ नोव्हेंबर १९८७ रोजी स्थलांतरित झाले.

आधुनिक व प्रगत जीवशास्त्रात उत्कृष्ट दर्जाचे मूलभूत संशोधन व प्रशिक्षण करणे तसेच जीवशास्त्राच्या विविध शाखांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रीकृत राष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक जीवशास्त्रातील मूलभूत संशोधन, समाजाभिमुख संशोधन आणि व्यवसायाभिमुख उपयोजित संशोधन हे तीन महत्त्वाचे कार्यक्रम या केंद्रात राबवले जातात. यामध्ये आदिकेंद्रिकी (प्रोकेरियोटिक), सकेंद्रकी (युकेरियोटिक) आणि पोषिता परजीवी (होस्ट पॅरासाइट्स) पेशींमधील अन्योन्यक्रिया, उत्क्रांती व विकास तसेच जनुकनियमन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या केंद्राने डीएनए अंगुलीमुद्रणच्या (डीएनए फिंगरप्रििटिंग) तंत्रज्ञान निर्मितीमध्ये जगात तिसरे स्थान पटकावले आहे. डीएनए अंगुलीमुद्रणचा पहिला फोटो या केंद्राने भारताच्या न्यायव्यवस्थेला सादर केला होता. या तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक गंभीर गुन्ह्यांचा व गुन्हेगारांचा शोध लावण्यात तसेच विमान अपघातातील मृतांची ओळख पटण्यात झाला आहे. जनुकांच्या अभ्यासातून विविध रोगजनक विषाणूंमुळे होणाऱ्या तसेच आनुवंशिक आजारांच्या निदानांचे संचही तयार केले जातात. कोविड संक्रमणाच्या काळात या केंद्राने निदानसंच पुरवले तसेच लस व औषधांच्या निर्मितीसाठी साहाय्य केले. भारतात तयार करण्यात आलेल्या कर्करोगावरील औषधांच्या चाचण्या आणि प्रमाणीकरण या केंद्रात केले जाते. कीड प्रतिरोधक पिकांच्या जातींची निर्मितीही या केंद्रात केली जाते. आशियातील वाघ आणि सिंहाच्या संपूर्ण जनुकीय माहितीचे संवर्धन तसेच विविध आनुवंशिक आजार यावरील संशोधनही हे केंद्र करते. केंद्र भारतासह अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांतील विद्यापीठे व संशोधन संस्था यांच्याबरोबर प्रायोजित संशोधन प्रकल्प राबवते. या केंद्राला युनेस्कोने पेशी व जीवशास्त्रातील समाजाभिमुख उत्तम संशोधन व तंत्रज्ञानासाठी ‘उत्कृष्ट केंद्र’ म्हणून गौरविले आहे; तसेच इटलीच्या तिसऱ्या जागतिक विज्ञान अकादमीने संशोधन व प्रशिक्षण यासाठीचे दक्षिणी केंद्र असे घोषित केले आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org