ज्या निरनिराळ्या खनिजांमध्ये रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन), रेण्वीय रचना (मोलेक्युलर स्ट्रक्चर) आणि गुणधर्म यांमध्ये उल्लेखनीय साधर्म्य असते, अशा खनिजांच्या गटाला ‘खनिजांचे कूळ’ (मिनरल फॅमिली) असे म्हणतात. खनिजांच्या अशा कुळांपैकी बऱ्याच जणांना माहिती असणारे, आणि मानवासाठी उपयुक्त असणारे कूळ म्हणजे अभ्रक कूळ. अभ्रक कुळातली खनिजे रासायनिक दृष्टीने सिलिकेट वर्गात येतात.
सिलिकेट प्रकारच्या खनिजांमध्येही त्यांच्या रेण्वीय रचनेप्रमाणे काही उपप्रकार आहेत. त्यापैकी पत्री सिलिकेट (फायलोसिलिकेट) उपप्रकारात अभ्रक कुळातल्या खनिजांचा समावेश होतो. याचे कारण म्हणजे अभ्रकाचा एखादा मोठा तुकडा पाहिला तर, अनेक पापुद्ऱ्यांचा मिळून बनला आहे असे आपल्या लक्षात येईल. त्यातले पापुद्रे आपल्याला सहजपणे वेगळे करता येतात. ते पारदर्शक आणि लवचीक असतात.
अभ्रक कुळात निरनिराळी ३७ खनिजे आहेत, पण त्यातली काही खनिजेच सर्वत्र आढळतात. या कुळातली खनिजे रंगांवरून दोन गटांत विभागली जातात; फिकट रंगाची आणि गडद रंगाची. फिकट रंगांच्या अभ्रक खनिजांमध्ये प्रामुख्याने मस्कोव्हाइट, फ्लोगोपाइट आणि पॅरॅगोनाइट यांचा समावेश होतो, तर गडद रंगांच्या खनिजांमध्ये प्रामुख्याने काळ्या रंगाचे बायोटाइट, हिरव्या रंगाचे फुशाइट, जांभळ्या रंगाचे लेपिडोलाइट यांचा समावेश होतो.
अभ्रक विद्याुत्-रोधक आणि उष्णता-रोधक आहे. शिवाय अभ्रकाला चमकही असते. याच गुणधर्मांमुळे अभ्रकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. इस्त्री, धुलाई यंत्र, विजेची शेगडी अशा अनेक प्रकारच्या विजेच्या घरगुती उपकरणांमध्ये अभ्रकाचा वापर केला जातो. याखेरीज काही सौंदर्य प्रसाधने आणि शोभेच्या वस्तू यांच्या उत्पादनांमधे अभ्रक वापरले जाते.
अभ्रक निसर्गामध्ये विपुल प्रमाणात आढळते. ते अग्निजन्य (इग्निअस), अवसादी (सेडिमेंटरी) आणि रूपांतरित (मेटॅमॉर्फिक) अशा तिन्ही प्रकारच्या खडकांमध्ये असू शकते. प्रत्येक ठिकाणी सापडणारे अभ्रक हे औद्याोगिक दृष्टीने उपयुक्त असेलच असे नाही. कारण बऱ्याच खडकांमध्ये, आणि विशेषत: अवसादी खडकांमध्ये, अभ्रक खनिजे छोट्या, पातळ तुकड्यांच्या स्वरूपात असतात. पण जेव्हा खडकांमध्ये जाड आणि मोठे स्फटिक विकसित झालेले असतात, तेव्हा पाहिजे त्या आकारात आणि पाहिजे त्या जाडीचे अभ्रकाचे तक्ते कापता येतात. भारतात औद्याोगिक उपयोगाच्या अभ्रकाचे भरपूर साठे असून ते आंध्र प्रदेश, तेलंगण, झारखंड, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांत आहेत.
– प्रा. सुधाकर पंडित,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org