संगणकीय दृष्टी ही तशी जुनी संकल्पना आहे. संगणकाला अंकाची भाषा समजते. त्यामुळे उपलब्ध माहिती अंक रूपात साठवून ठेवणे शक्य झाले. लेखी आणि मौखिक माहितीबरोबरच अंकांच्या मदतीने चित्रांबद्दलदेखील माहिती साठवून ठेवता येईल, अशी कल्पना काही संगणकतज्ज्ञांनी मांडली. त्याबरहुकूम लहान कॅमेरे बनवून ते संगणकात बसवण्यात आले. जिथे हे शक्य नव्हते तिथे कॅमेरा संगणकाला जोडण्यात आला. त्याच्यापुढे एखादी वस्तू किंवा चित्र ठेवले तर त्याचे डिजिटल माहितीत रूपांतर केले जाऊ लागले. हे कार्य केवळ द्विमितीय वस्तूंसाठी मर्यादित नसून त्रिमितीय वस्तूंसाठी करता येऊ लागले. याच्या पुढची पायरी म्हणजे चलचित्रांचे डिजिटल रूपांतर होय. हेही कालांतराने शक्य झाले.

संगणकीय दृष्टीच्या वापराचे प्रमुख तीन भाग आहेत. कॅमेऱ्याच्या मदतीने मिळालेल्या स्थिरचित्र किंवा चलचित्र यांची माहिती अंकीय रूपांतर करून जतन करणे, हा झाला पहिला भाग. या माहितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेणे हा दुसरा भाग. त्याचबरोबर दिलेल्या आदेशानुसार वेगवेगळय़ा चित्रकृती निर्माण करणे हा तिसरा भाग. या तिन्ही प्रकारची कामे संगणकीय दृष्टी प्रणालीच्या मदतीने अतिशय प्रभावीपणे करता येतात. त्यामुळे तिला अलीकडच्या काळात फारच महत्त्व आले आहे.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

संगणकाला चित्रांची बाह्यरेखा ओळखणे शिकविण्यात आले. त्यानंतर संगणकाला चित्राच्या वेगवेगळय़ा भागांची माहिती देण्यात आली. त्यावरून याआधी असे चित्र जर संगणकात आले असेल तर त्या दोघांमध्ये कोणते साम्य आहे याची माहिती संगणक देऊ लागला. याच्या आधारे चेहरा ओळखणे सहज शक्य झाले. आजच्या घडीला हे तंत्र फारच विकसित झाले असून एखाद्या चेहऱ्याला मेकअप केल्यावर तो कसा दिसेल, हेसुद्धा संगणक दाखवू शकतो. तसेच त्रिमितीय स्वरूपात जर एखादे चित्र असेल तर त्याचाही अर्थ लावण्याचे काम संगणक करू शकतो. अशी आहे संगणकीय दृष्टीची कमाल. आजच्या घडीला संगणकीय दृष्टी प्रणाली चांगलीच विस्तारित झाली आहे.

आजकाल आपल्या देशात डिजिटल पद्धतीने पैशांची देवाणघेवाण केली जाते. या पद्धतीला युनिफाइड पेमेंट इन्टरफेसचा (यूपीआय) असे म्हणतात. त्यासाठी क्यूआर कोडचा वापर होतो. या क्यूआर कोडचे वाचन करण्यासाठी संगणकीय दृष्टी प्रणालीचाच वापर केला जातो. ही पद्धत फारच विश्वसनीय ठरली आहे.

डॉ. सुधाकर आगरकर, मराठी विज्ञान परिषद