सुनीता सोलोमन या पूर्वाश्रमीच्या सुनीता गायतोंडे. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३९ रोजी चेन्नई येथे चामड्याचा व्यापार करणाऱ्या कुटुंबात झाला. सुनीता सोलोमन या डॉक्टर आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होत्या. एड्सचे संशोधन आणि एड्सच्या निर्मूलनाविषयीच्या त्यांच्या कार्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.
सुनीता या मद्रास वैद्याकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. तेथे शिकत असताना हृदयरोग शल्य चिकित्सक डॉक्टर व्हिक्टर सोलोमन यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. सुनीता यांनी युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी विकृतीशास्त्रात विशेष प्रशिक्षण घेतले. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पीएच.डी. ही पदवी संपादन केली. पुढे त्या मद्रास वैद्याकीय महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात रुजू झाल्या आणि तेथेच पुढे प्रोफेसरही झाल्या.
१९८३साली एड्सच्या एचआयव्ही व्हायरसचा प्रत्यक्ष शोध लागला. त्याकाळी भारतात एचआयव्हीबद्दल फारच कमी माहिती होती. एचआयव्हीवर काम करणे डॉक्टरांसाठीसुद्धा धोक्याचे मानले जात होते. अशा परिस्थितीत १९८६ साली त्यांनी वेश्या व्यवसायातील १०० स्त्रियांची तपासणी केली. त्यात सहा नमुने एड्सग्रस्त होते. भारतातील एड्सग्रस्त रुग्णांची ही पहिली नोंद आहे.
१९८८ ते १९९३ या कालावधीत त्यांनी मद्रास वैद्याकीय महाविद्यालयात भारतातील पहिला ‘एड्स रिसोर्स ग्रुप’ तयार करून संशोधन आणि सामाजिक प्रबोधनाला सुरुवात केली. १९९३ साली त्यांनी आपल्या वडिलांच्या नावे ‘वाय आर गायतोंडे एड्स संशोधन आणि अभ्यास केंद्र’ स्थापन केले. चेन्नईच्या एड्स डॉक्टर म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. भारतीय एड्स संस्थेच्या त्या अध्यक्ष होत्या.
२००१ साली त्यांना एड्सच्या क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे काम केल्याबद्दल गौरवण्यात आले. तमिळनाडू राज्य एड्स नियंत्रण संस्थेने २००५ साली त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. २००६ साली त्यांना अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठाने ‘डीएमएस’ पुरस्काराने सन्मानित केले. २००९ साली भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांना ‘राष्ट्रीय महिला जीव-शास्त्रज्ञ’ पारितोषिकाने सन्मानित केले. २०१० साली नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले. २०१२ साली चेन्नईच्या एमजीआर वैद्याकीय महाविद्यालयाने त्यांना त्यांच्या एड्स व एचआयव्ही क्षेत्रातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले. त्यांच्या स्मरणार्थ बंगलोरमध्ये सोलोमन फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. सुनीता यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले आणि २८ जुलै २०१५ रोजी चेन्नईच्या घरीच त्यांचे निधन झाले.
डॉ. रंजन गर्गे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org