रशियन वंशाचे आणि इस्रायल राष्ट्रनिर्मितीच्या चळवळीचे प्रमुख म्हणून ओळख असणारे खेम वेत्झमन हे इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. १६ फेब्रुवारी १९४९पासून जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी इस्रायलचे अध्यक्षपद भूषविले. उद्याोग क्षेत्रातील किण्वन क्रियेचे जनक म्हणून त्यांना संबोधले जाते. जीवाणूंच्या साहाय्याने अॅसिटोन-ब्यूटेनॉल-इथेनॉल निर्मितीची किण्वन क्रिया त्यांनी विकसित केली. असिटोन निर्मितीसाठी त्यांनी क्लोस्ट्रीडीयम असिटोब्युटीलीकम या जीवाणूंचा वापर केला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश लष्कराला या अॅसिटोनचा अनन्यसाधारण उपयोग झाला.

१८७४ मध्ये रशियन साम्राज्याचा भाग असलेल्या आणि आता पश्चिम बेलारूसमध्ये असलेल्या मोटोल या खेड्यात जन्मलेले ते कुटुंबातील १५ मुलांपैकी तिसरे होते. ते रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीतील डार्मस्टॅड येथे आणि नंतर बर्लिनला गेले. शेवटी १८९७ मध्ये फ्रायबर्ग विद्यापीठात शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वित्झर्लंडला गेले. तिथे त्यांनी १८९९ मध्ये सेंद्रिय रसायनशास्त्रात विशेष प्रावीण्यासह पीएच.डी. प्राप्त केली. १९०१मध्ये त्यांची जिनिव्हा विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून तर १९०४ मध्ये मॅन्चेस्टर विद्यापीठात वरिष्ठ अधिव्याखाता पदावर नियुक्ती झाली.

१९१०साली ते ब्रिटनचे नागरिक होऊन पुढे १९४८ पर्यंत तिथेच राहिले. येथे चार्ल्स वेत्झमन या नावाने ओळखले जाऊ लागले. १०० पेटंट्सची नोंद त्यांनी याच नावाने केली. जीवाणूंच्या साहाय्याने उपयुक्त पदार्थांच्या औद्याोगिक निर्मितीसाठीच्या संशोधनासाठी त्यांच्या नावाचा मॅन्चेस्टर विद्यापीठात लौकिक होता. पहिल्या महायुद्धात स्फोटके तयार करण्यासाठी अॅसिटोनचा उपयोग होत असे. आरमार प्रमुख चर्चिल आणि डेव्हिड जॉर्ज यांनी १९९५ मध्ये वेत्झमन यांना अॅसिटोननिर्मितीच्या संशोधनासाठी प्रोत्साहित करून त्याचे संपूर्ण हक्क ‘कमर्शियल सोल्वंट कार्पोरेशन’ला दिले. सन १९१५ मध्ये वेत्झमन ब्रिटिश आरमाराच्या प्रयोगशाळेचे संचालक झाले. १९१८मध्ये दुर्मीळ खनिजांच्या शोधात ते पॅलेस्टाइनला परतले. ब्रिटिशांच्या उदारमतवादी धोरणामुळे वेत्झमनला आर्थिक आणि औद्याोगिक मदत झाली.

त्यानंतर वेत्झमन यांनी इस्रायलच्या रीहोवोट शहरात पडलेल्या त्यांच्या स्थावर मालमत्तेशेजारी मूलभूत संशोधनासाठी विज्ञानसंस्था स्थापन केली. विज्ञानाचा उपयोग शांतता आणि मानवाच्या उत्कर्षासाठी होईल अशी त्यांना आशा आणि खात्री होती. १९३४ साली ‘डनियल सिफ’ संशोधन संस्थेची निर्मिती करून सेंद्रिय रसायनशास्त्रामध्ये संशोधन केले. १९४९ साली याच संस्थेचे नामांतर ‘वेत्झमन विज्ञान संस्था’ असे झाले आणि इस्रायलच्या विज्ञान क्षेत्रात त्यांची मानक प्रतिमा निर्माण झाली. ९ नोव्हेंबर १९५२ रोजी वयाच्या ७७व्या वर्षी त्यांचे इस्रायलच्या रीहोवोट शहरात निधन झाले.

डॉ. गजानन माळी, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org