एखाद्या सजीवाच्या मृत्यूनंतर खडकाच्या थरांमध्ये त्याच्या अवशेषाचे जतन होते. त्या अवशेषाला जीवाश्म म्हणतात. मूळ जीवाश्म त्या वेळच्या भूवैज्ञानिक स्थितीनुसार तयार होतो. ज्या सजीवाचा तो जीवाश्म आहे, तो सजीव कोणत्या कालखंडात अस्तित्वात होता, हे त्या जीवाश्माच्या अभ्यासावरून सांगता येते. पण काही वेळेस जीवाश्म ज्या खडकात निर्माण झाला त्या मूळ खडकाची झीज झाल्यामुळे त्या खडकापासून अलग होतो, आणि तुलनेने नवीन खडकातील थरात पुनरावसादित (रिडिपॉझिटेड) होतो. त्यामागे भूवैज्ञानिक कारणे असतात. एका ठिकाणी तयार झालेल्या जीवाश्माचे लांब अंतरावर वहन (ट्रान्सपोर्ट) झाले तर त्याची झीज व मोडतोड होऊन पुनर्निर्मित जीवाश्म (रीवर्क्ड फॉसिल) तयार होऊ शकतात.
ज्या अवसादामध्ये मूळ जीवाश्म तयार होतो तो अवसाद विशिष्ट वातावरणात तयार झालेला असतो. पण कालांतराने त्या अवसादी खडकाची होणारी झीज (इरोजन), आणि त्या जीवाश्माचे विस्थापन, या दोन प्रक्रिया मूळ जीवाश्माचे पुनर्स्थापन होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
पृथ्वीच्या इतिहासात सागरी अतिक्रमण (मरिन ट्रान्स्ग्रेशन) व सागरी प्रतिगमन (मरिन रीग्रेशन) या प्रक्रिया क्रमाने होत असतात. पाणी उथळ असताना सागर तळाची धूप जास्त प्रमाणात होते आणि अतिक्रमण काळात नवीन गाळ साठतो. सागरांचे जेव्हा पुन्हा प्रतिगमन सुरू होते, तेव्हा नवीन गाळ थराच्या स्वरूपात साठत राहतो. या नव्या थरांमध्ये जीवाश्म तयार होतात.
जेव्हा पुन्हा अतिक्रमणाची प्रक्रिया सुरू होते तेव्हा आधीच्या थरांबरोबरच त्यातील जीवाश्मांची झीज होते व झीज झालेले जीवाश्म नव्याने तयार झालेल्या थरांमध्ये पुन्हा अवसादित होतात यांनाच पुनर्निर्मित जीवाश्म असे म्हटले जाते. याशिवाय सागरतळाशी साठणाऱ्या गाळात विवरे करून राहणाऱ्या सजीवांच्या हालचालींमुळेदेखील जीवाश्मांच्या मूळ स्थानात बदल घडून येतो. जीवाश्म ठिसूळ असल्यास असा बदल घडून येत असताना जीवाश्मांची तूटफूट किंवा मोडतोड होते. त्यातून दात व हाडांचे तुकडे होणे, सजीवांच्या बाह्यकवचाचे तुकडे होणे, अथवा जतन झालेल्या अवयवांचे बारीक बारीक तुकडे होऊन ते पूर्णत: नष्ट होऊन जाणे अशा अनेक शक्यता संभवतात. यामुळे पुनर्निर्मित जीवाश्मांचा शोध घेणे, त्यांची ओळख पटवणे व त्यांचा नेमका भूवैज्ञानिक कालखंड शोधून काढणे हे आव्हानात्मक असते.
रेडिओलॅरियन सिंधूपंक (रेडिओलॅरियन ऊझ) मध्यजीव कल्प (मेसोझोईक) व नवजीव कल्प (सिनोझोईक) अशा दोन्ही कालखंडांत सागरतळावर अवसादित झाले आहेत. त्यांमध्ये मध्यजीव कल्पात निर्माण झालेले जीवाश्म नवजीव कल्पात पुनर्निर्मित झालेले आढळतात.
– डॉ. योगिता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org