मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांची अश्मयुग, ताम्रयुग अशी नावे जरी पाहिली तरी मानवी संस्कृतीची नाळ खडक आणि खनिजांशी किती जुळलेली आहे, हे लक्षात येईल. काही खनिजे आपल्या पूर्वजांनी कोणत्या ना कोणत्या कामांसाठी वापरली होती. त्यामुळे त्या खनिजांची नावे ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहेत. अर्थातच सर्व भाषांमधे खनिजांना पारंपरिक नावे आहेत. मराठीतही काही खनिजांसाठी सैंधव, अभ्रक, सुवर्णमाक्षिक, अशी नावे आपण वापरतो. हिंदीमध्येही जांभळे स्फटिक असणाऱ्या अॅमेथिस्ट नावाच्या खनिजाला जामुनिया म्हणतात.

विज्ञानाचा जसजसा विकास होत गेला, तसतशी नवी नवी खनिजे उजेडात येऊ लागली. खनिजांच्या संख्येत भर पडू लागली. आजमितीस पृथ्वीवर सुमारे साडेपाच हजार खनिजांचा शोध लागला आहे. परंतु १९५०च्या दशकात असे लक्षात येऊ लागले, की काही खनिजांना एकापेक्षा अधिक नावे आहेत, तर कधीकधी एकाच नावाने दोन किंवा अधिक खनिजे ओळखली जात आहेत. त्यामुळे खनिजांच्या अभ्यासकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

तेव्हा जगभरातील खनिजवैज्ञानिकांनी एकत्र येऊन १९५८ मधे आंतरराष्ट्रीय खनिजवैज्ञानिक संघटना स्थापन केली. या संघटनेने नवीन खनिजांचे नाव ठरवण्यासाठी जागतिक स्तरावरचा आयोग स्थापन केला. पूर्वी कोणाला नवे खनिज सापडले, तर आपल्या मर्जीप्रमाणे तो त्या खनिजाला नाव देऊन एखाद्या वैज्ञानिक नियतकालिकाकडे आपला शोधनिबंध पाठवत असे. त्याचा तो शोधनिबंध प्रसिद्धही होत असे, पण आता आंतरराष्ट्रीय खनिजवैज्ञानिक संघटनेने एकमुखाने घेतलेल्या निर्णयानुसार असा शोधनिबंध आधी या आयोगाकडे पाठवावा लागतो. खनिजासाठी सुचवलेले नाव दुसऱ्या एखाद्या खनिजासाठी आधी वापरलेले नाही, याची पडताळणी तर आयोग करतोच, पण नाव योग्य आहे की नाही हेही पाहातो.

खनिजवैज्ञानिकांनी मान्य केलेल्या प्रथांप्रमाणे काही खनिजांची नावे संशोधकाच्या नावावरून दिली गेली आहेत. विल्यम हाइड वोलॅस्टन यांच्या नावावरून एका खनिजाला वोलॅस्टनाइट असे नाव देण्यात आले आहे. खनिज जिथे आढळते त्या ठिकाणावरूनही खनिजांना नावे दिली गेली आहेत, रशियातल्या मॉस्कोच्या पूर्वीच्या ‘मस्कोव्ही’ नावावरून अभ्रक कुलातल्या एका खनिजाचे नाव मस्कोव्हाइट पडले आहे. खनिजाच्या एखाद्या गुणधर्मावरून अथवा रासायनिक संघटनेवरूनही खनिजांना नावे देण्याचा प्रघात आहे. उदा. कॅल्शियम, व्हॅनॅडियम आणि सिलिकॉन ही मूलद्रव्ये असणाऱ्या एका खनिजाचे नाव आहे कॅव्हॅन्साइट. हे खनिज पुण्याच्या परिसरातही आढळते.

डॉ. अजित वर्तक, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org