ऊती, पेशी आणि हाडामासापासून तयार झालेली ज्ञानेंद्रिये, नसांचे जाळे आणि मेंदू यांनी सुसज्ज असलेली आपली बुद्धी ही आपली अतुलनीय शक्ती आहे. आपली बुद्धी ज्ञानेंद्रियांकडून संवेदना प्राप्त करून नसांच्या जाळय़ांमार्फत मेंदूत पोहोचलेल्या संदेशांवर प्रक्रिया करून निर्णय घेते हे स्पष्ट आहे. मात्र ती अंतिम सोपस्कारांची प्रक्रिया अंतर्गतपणे कशी घडते हे अजूनही रहस्य आहे. विशेषकरून आपल्या भावनाविश्वाबद्दल आपण बहुतांशी अनभिज्ञ आहोत.
याच्या विरुद्ध विज्ञानाचा भाग असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता ही तत्त्वत: गणन प्रणालीच्या अतिशय प्रगत संचांचे रूप असून अभियांत्रिकी पद्धतीने काम करते. म्हणजेच ती आपल्या बुद्धिमत्तेपेक्षा वेगळय़ा रीतीने कार्यान्वित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली प्रणाली ही क्लिष्ट इलेक्ट्रॉनिक परिपथांच्या (सर्किट्स) मदतीने उभारलेल्या स्मृतिमंजूषा आणि केंद्रीय प्रक्रीयक (सेन्ट्रल प्रोसेसर) या यांत्रिकी भागांनी आणि कार्याच्या प्रत्येक पायरीसाठी कुठलीही संदिग्धता नसलेल्या बाहेरून दिलेल्या आज्ञावलींनी कार्य करते. त्यामुळे बाह्य प्रोग्राम्सनी दिलेल्या सूचना अभियांत्रिकी घटकांनी अमलात आणल्या जातात.
आपल्या बुद्धीला दाद दिली पाहिजे जिने कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त अशा कित्येक प्रणाली विकसित केल्या आहेत, ज्या आता आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाच्या झाल्या आहेत. ‘स्मार्ट’ फोन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याशिवाय विशिष्ट कार्यासाठी यंत्रमानव व इतर अनेक साधने आता उपलब्ध झाली आहेत. साहजिकच त्यामुळे प्रश्न येतो की भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला मागे तर टाकणार नाही ना? या संदर्भात विविध शक्यता मांडणाऱ्या विज्ञानकथा, चित्रपट आणि इतर साहित्य निर्माण होत आहे. नमूद करण्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या निर्मितीतही कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा सहभाग आहे!
अशा प्रणालींचे भरघोस फायदे मिळत असले, तरी मनुष्य यंत्रमानवाचा गुलाम होईल अशी कित्येक भयावह चित्रे वेळोवेळी सादर केली जात आहेत. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली प्रणाली मानवाच्या मध्यस्थीशिवाय, स्वतंत्रपणे नवी आगळीवेगळी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली प्रणाली निर्माण करू शकेल हे आज तरी स्वप्नरंजन आहे. याला वर नमूद केल्याप्रमाणे मुख्य कारण म्हणजे मानवी मनाचे कार्यतंत्र (अल्गोरिदम) आपल्यालाच माहीत नसणे. त्यामुळे त्याची नक्कल कार्यक्षमपणे करू शकणारे यंत्र रचणे दुरापास्त मानले जाते. तरी कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांवर विशेष बंधने घातली गेलेली नाहीत.
डॉ. विवेक पाटकर, मराठी विज्ञान परिषद