मार्विन ली मिंस्की हे अमेरिकन गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ मुख्यत्वे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध होते. ते एमआयटीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रयोगशाळेचे सहसंस्थापक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच तत्त्वज्ञानाशी संबंधित अनेक ग्रंथांचे लेखक होते. मिंस्की यांना कृत्रिम बुद्धिमत्तेमधील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी १९६९ चा ए. एम. टय़ुरिंग पुरस्कार हा संगणकशास्त्रातील सर्वात मोठा सन्मान मिळाला होता.
मिंस्की यांचा जन्म ९ ऑगस्ट १९२७ रोजी न्यू यॉर्क शहरात झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश केला. तिथे त्यांनी भौतिक शास्त्र, मेंदूअवयवशास्त्र, मानसशास्त्र आणि गणित विषयाचा अभ्यास केला. १९५१ मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी पहिले न्युरल नेटवर्क सिम्युलेटर तयार केले. मिंस्की यांनी १९५४ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून गणित विषयात पीएच.डी. मिळवली. ‘न्युरल-अॅनालॉग रीएन्फोर्समेंट सिस्टिम्सचा सिद्धांत आणि मेंदू-मॉडेल समस्येवर त्याचा उपयोग’ हे त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधाचे शीर्षक होते.
१९५४ ते १९५७ या काळात मिंस्की हार्वर्ड सोसायटी ऑफ फेलोचे कनिष्ठ फेलो होते. १९५८ मध्ये ते एमआयटी लिंकन प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये सामील झाले आणि एका वर्षांनंतर त्यांनी आणि जॉन मॅककार्थीने एमआयटी संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेची स्थापना केली. त्यांच्या संशोधनामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, संज्ञानात्मक मानसशास्त्र (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी), न्युरल नेटवर्क, टय़ुरिंग मशीन्स आणि पुनरावर्ती कार्याचा सिद्धांत यामध्ये
सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रगती झाली. प्रोफेसर मिंस्की हे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि टेलिप्रेझेन्सचे प्रणेते होते. त्यांनी काही पहिले व्हिज्युअल स्कॅनर्स, स्पर्श सेन्सर्ससह यांत्रिक हात, पहिले प्रतीक चिन्ह आणि त्यांचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंटरफेस डिझाइन तयार केले. १९५८ पासून मृत्यूपर्यंत ते एमआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
‘संगणन: मर्यादित आणि अनंत मशीन्स’ , ‘प्रेंटिस-हॉल’ (१९६७), ‘द सोसायटी ऑफ माइंड’ (१९८६), ‘द इमोशन मशीन : कॉमनसेन्स थिंकिंग’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी मनाचे भविष्य’ (२००६) ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. मिंस्की ‘अल्कोर लाइफ एक्स्टेंशन फाउंडेशन’च्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य होते. थोर शास्त्रज्ञ, मिन्स्की यांचे २४ जानेवारी २०१६ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले.
– गौरी देशपांडे,मराठी विज्ञान परिषद