किरणोत्सारी खनिजांच्या खाणकामापासून ते अणुभट्टीमध्ये विद्याुतऊर्जा निर्मितीपर्यंतच्या प्रक्रियेत खनिजांचे उत्पादन, त्यांच्यावरचे संस्करण, त्यांचे कच्च्या इंधनात रूपांतर, अंतिम इंधनात रूपांतर आणि ऊर्जानिर्मिती अशा टप्प्यांचा समावेश असतो. यातल्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचा आण्विक (किरणोत्सारी) कचरा निर्माण होतो.
आण्विक कचरा घन, द्रव किंवा वायुरूप अशा कोणत्याही अवस्थेत असू शकतो. आण्विक कचऱ्याचे वर्गीकरण त्यातील किरणोत्सारी पदार्थांचे प्रमाण, किरणोत्साराची तीव्रता या निकषांवर करण्यात येते. कचरा निम्नस्तरीय, मध्यमस्तरीय आणि उच्चस्तरीय असा विभागला जातो. उच्चस्तरीय कचरा सर्वांत धोकादायक आणि दीर्घकाळ टिकून राहाणारा असतो; निम्नस्तरीय कचरा कमी धोकादायक असतो.
निम्नस्तरीय आणि मध्यमस्तरीय कचरा एकूण कचऱ्याच्या ९७ टक्के असतो. त्याचे किरणोत्साराचे प्रमाण केवळ पाच टक्के असते. उच्चस्तरीय कचरा एकूण कचऱ्याच्या तीन टक्के असतो; परंतु त्याच्यात किरणोत्साराचे प्रमाण ९५ टक्के असते. कारण त्यात अणुभट्टीत वापरले गेलेले अणुइंधन आणि त्याच्या विखंडनापासून उत्पादित पदार्थ असतात.
निम्नस्तरीय कचऱ्यात कागद, चिंध्या आणि इतर साधने असतात. त्यांच्या किरणोत्साराची तीव्रता माफक असल्याने, तो कचरा जमिनीवरील सुविधांमध्ये योग्य ती काळजी घेऊन जाळतात. मध्यमस्तरीय कचऱ्यात सामान्यत: रेझिन आणि रासायनिक प्रक्रियांद्वारा निर्माण झालेले पदार्थ, धातूंची उपकरणे, इंधनावरचे आवरण इ. दूषित पदार्थ असतात. त्याचे किरणोत्सर्जन काहीसे अधिक प्रमाणात आणि दीर्घकाळ टिकणारे असते. अशा कचऱ्याला काँक्रीट किंवा बिटूमेन नावाच्या रसायनात एकजीव करून आणि घनरूप देऊन जमिनीखाली दहा मीटर किंवा थोड्या अधिक खोलीवर गाडतात.
उच्चस्तरीय कचरा अत्यंत किरणोत्सारी आणि उष्ण असतो. त्याचा घातकपणा लाखो वर्षे टिकू शकतो. त्याची काळजीपूर्वक विल्हेवाट कशी लावावी यावर जागतिक स्तरावर अनेक उपायांवर विचारविनिमय चालू आहे. अशा कचऱ्याचे काचीकरण (व्हिट्रिफिकेशन) करून भूगर्भात २०० मीटरपेक्षा अधिक खोल गाडून टाकणे हा सर्वांत महत्त्वाचा उपाय मानला जातो. तो तिथे लाखो वर्षे स्थिर राहील अशी जागा शोधावी लागते. भूविज्ञानाच्या दृष्टीने लक्षावधी वर्षांपासून भूकंप किंवा ज्वालामुखी यांपासून ती जागा मुक्त आहे, याची खात्री करून घ्यावी लागते. तिथे पडणारा यांत्रिक किंवा औष्णिक ताण सहन करण्याची क्षमता तिथल्या खडकांमध्ये असली पाहिजे. तिथली भूरासायनिक परिस्थितीही अनुकूल असणे आणि भूजलाचे प्रवाह कमीतकमी असणे आवश्यक असते. तिथे ग्रॅनाइट, बेसाल्ट, चिकणमाती असे किरणोत्सारी पदार्थाची गळती न होऊ देणारे खडक असावेत, हे पाहावे लागते.
– अरविंद आवटी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org