काही मूलद्रव्यांना आपण किरणोत्सारी म्हणतो, कारण त्यांच्या अणूंमधून ज्या किरणांना विज्ञानात गॅमा किरण म्हणतात ते किरण; आणि ज्या कणांना अल्फाकण आणि बीटाकण म्हणतात ते कण, सतत बाहेर पडत असतात. म्हणजेच उत्सर्जित होत असतात. सामान्यत: युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियम ही मूलद्रव्ये, आणि ज्या मूलद्रव्यांच्या नाभिकेत (न्युक्लियस) ८२ पेक्षा जास्त प्रोटॉन असतात, ती मूलद्रव्ये किरणोत्सारी असतात. तथापि त्यांपैकी काही ठरावीक मूलद्रव्यांपासूनच आपण ऊर्जा निर्माण करू शकतो. साहजिकच त्या मूलद्रव्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

किरणोत्सारी मूलद्रव्यांपैकी ऊर्जा निर्मितीसाठी जास्तीत जास्त वापरले जाणारे मूलद्रव्य म्हणजे युरेनियम. पण क्वचित काही ठिकाणी थोरियमचाही वापर केला जातो. या दोन्ही मूलद्रव्यांची निर्मिती त्यांच्या खनिजांपासून करावी लागते. अर्थातच सर्व किरणोत्सारी मूलद्रव्यांची खनिजेसुद्धा किरणोत्सारी असतात. युरेनियम आणि थोरियम या दोन्ही मूलद्रव्यांचा शोध काही खनिजांचे रासायनिक पृथ:करण करताना लागला.

बोहेमियामधल्या चांदीच्या खाणींमध्ये चांदीच्या खनिजासमवेत पिचब्लेंड नावाचे दुसरे एक खनिज आढळते. मार्टिन हाइनरिख क्लापरोठ हे एक जर्मन रसायन वैज्ञानिक होते. त्यांनी बोहेमियामधल्या पिचब्लेंडचे १७८९ मध्ये रासायनिक पृथ:करण केले, तेव्हा पिचब्लेंड हे खनिज एका वेगळ्याच, तोपर्यंत माहिती नसलेल्या एका मूलद्रव्याचे ऑक्साइड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या नव्या मूलद्रव्याला क्लापरोठ यांनी युरेनियम हे नाव दिले, युरेनियम किरणोत्सारी असल्याचा शोध मात्र नंतर शंभर वर्षांनी, म्हणजे १८९६ मध्ये लागला, तो हेन्री बेकेरेल यांनी लावला.

थोरियम या मूलद्रव्याचा शोध असाच १८२८ मध्ये, स्वीडिश रसायन वैज्ञानिक यॉन्स याकोब बर्जेलियस यांना नॉर्वेमध्ये सापडलेल्या एका नव्या, दुर्मीळ खनिजाचे रासायनिक पृथ:करण करताना लागला. ज्या खनिजाचे रासायनिक पृथ:करण करताना थोरियमचा शोध लागला, त्या खनिजाचे नाव थोराइट असे आहे. थोराइट हे थोरियम सिलिकेट आहे, ज्याच्यात युरेनियमचे काही अंशी प्रतिस्थापन होते.

पृथ्वीच्या कवचामध्ये युरेनियम आणि थोरियम कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तथापि त्यांची खनिजे कोणत्या ना कोणत्या खडकांमध्ये, मातीमध्ये आणि पाण्यामध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळतात. युरेनियम आणि थोरियम ही मूलद्रव्ये गौण (अॅक्सेसरी) खनिजाच्या रूपात अनेक संयुगात सापडतात. त्या खनिजांमध्ये युरेनियमचे आणि थोरियमचे प्रमाण अल्प ते जास्त मात्रांमध्ये असू शकते. आतापर्यंत युरेनियमची अडीचशेहून अधिक खनिजे शोधली गेली आहेत. त्यांच्यापैकी युरेनिनाइट (पिचब्लेंड) हे खनिज ऊर्जानिर्मितीसाठी महत्त्वाचा स्रोत आहे. थोरियमचीही विविध रूपे आहेत, पण थोरियमचा मुख्य स्रोत मोनाझाइट हे खनिज आहे.

अरविंद आवटी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org