स्वचालित (सेल्फ ड्रायव्हिंग) वाहनांचा आज खूप गाजावाजा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत ही वाहने आजूबाजूची माहिती घेऊन त्यानुसार आपला मार्ग निश्चित करून पुढे जात राहतात. गाडी कार्यक्षमतेने चालवणे, अपघात टाळणे, योग्य वेग आणि शिस्त राखणे या वैशिष्ट्यांमुळे ही वाहने लोकप्रिय होऊ लागली आहेत. पण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी ही वाहने कायम निर्धोक असतील का? त्यांच्याकडून कधीच चूक होणार नाही का? समजा एखाद्या स्वचालित गाडीच्या समोर आकाशी रंगाचा मोठा ट्रक आला आणि आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो ट्रक वेगळा न ओळखता तशीच गाडी पुढे जातच राहिली तर? किंवा एखादा माणूस स्तब्ध उभा असताना त्याला निर्जीव वस्तू समजून गाडीने धडक मारली तर? वाहतूक सुरळीत ठेवणे हा स्वचालित वाहनांचा एक मुख्य उद्देश. मात्र २०२३ मध्ये अमेरिकेतल्या निरनिराळ्या शहरांमध्ये स्वचालित वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दाखले आहेत. तशीच परिस्थिती आरोग्यसेवेत उद्भवू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या चॅटबॉटने रुग्णाला चुकीचा वैद्याकीय सल्ला दिला तर? किंवा रोगनिदान करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने रोग वेळीच ओळखला नाही तर? रोग नसताना त्याचे निदान केले तर? व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने माणसांचे निर्णय व्यक्तीव्यक्तीनुसार वेगळे असू शकतात. त्यात चुका झाल्या तरी आपण त्या व्यक्तीचा स्वभाव, पार्श्वभूमी, त्या क्षणाची परिस्थिती यांचा विचार करून समजून घेऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेकडून मात्र कायम अचूक निर्णय मिळावा, अशी अपेक्षा असते. म्हणूनच प्रणालीत सर्वतोपरी विश्वासार्हता आणणे हे या क्षेत्रातील तज्ज्ञांपुढील मोठे आव्हान आहे. एका अभ्यासात दिसले की हवाई वाहतूक नियंत्रक किंवा अणुऊर्जा प्रकल्प चालक नेहमी जोखमीच्या परिस्थितीतही अत्यंत विश्वासार्ह काम करतात. त्यामागील कारणे शोधल्यावर लक्षात आले की कुठे विसंगती, त्रुटी, चुकांची शक्यता आहे का यावर या व्यक्तींचे सतत लक्ष असते आणि चुका झाल्याच तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा त्यांना पुष्कळ अनुभव असतो. अशीच क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेलाही देता येईल. एका कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे अंदाज दुसऱ्या प्रणालीकडून तपासून मगच ग्राह्य मानायचे असाही एक पर्याय आहे. आणीबाणीच्या कोणत्याही क्षणी माणूस किंवा साहाय्यक प्रणाली हस्तक्षेप करून मुख्य प्रणालीचा ताबा घेईल अशी व्यवस्था करता येईल. अशा आणखी अनेक दिशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वासार्हतेवर संशोधन सुरू आहे. - डॉ. मेघश्री दळवी,मराठी विज्ञान परिषद