कुष्ठरोग्यांच्या उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन यासाठी आनंदवन आपल्याला माहिती आहे. पण वृक्षरोपण व संवर्धनाचे तिथले काम तितकेच महत्त्वाचे आहे. तिथे वेगवेगळय़ा कामांसाठी बांधलेल्या इमारती आणि तिथली जमीन शेतीयोग्य करण्यासाठी काही झाडे तोडावी लागली हे खरे असले, तरी मोठी झाडे वाचवून त्याभोवती पार बांधून त्याचा उपयोग केला आहे. तसेच जी काही झाडे तोडावी लागली, त्या बदल्यात किती तरी जास्त लागवडही केली आहे. तोडलेल्या झाडांची स्मरणशिला/ समाधी उभारून आठवण ठेवली आहे. इतकेच नव्हे तर, आनंदवनात होणाऱ्या सगळय़ा कार्यक्रमांत झाडे लागवडीचा समावेश असतो. ही लागवड करताना स्मरणशिलेपासून रोपांची पालखीतून मिरवणूक काढली जाते. रोपे लागवडस्थळी नेली जातात. २५ जानेवारी १९९० रोजी लावलेले वडाचे झाड आजही तुम्ही पाहू शकता!

झाडे लावताना पूर्वतयारी काटेकोरपणे केली जाते. लावायच्या रोपाच्या प्रजातीनुसार खड्डा खणला जातो, त्यात शेणखतमिश्रित माती भरून मगच रोपे लावतात. जशी लागवडीसाठी काळजी घेतली जाते, तशीच लागवड केल्यावर पाणी घालणे, बाल्यावस्थेत माणसे व जनावरांपासून सरंक्षण करताना बाभळीचा वा बांबूचा संरक्षक कठडा वापरणे, नियमितपणे देखभाल करणे हेही केले जाते. यामुळेच अगदी फेब्रुवारीत लावलेल्या रोपांपैकी पण ९६ ते ९८ टक्के रोपे जगली आहेत. एकदा अभ्यासाकरिता सप्टेंबर १९८३ मध्ये (पावसाळा संपताना) केलेल्या पाच प्रजातीच्या लागवडीबाबतीतही असाच अनुभव आला.

झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन देतात, जमिनीची धूप थांबवतात, आपल्याला सावली देतात, अनेक पक्ष्यांना आश्रय देतात, फुलाफळांपासून ते जैवभारापर्यंत अनेक उत्पादने देतात. हे सगळे फायदे लक्षात घेऊन तरी मानवाने झाडांची लागवड केली पाहिजे आणि योग्य काळजी घेत झाडे वाढवली पाहिजेत.

गेल्या काही वर्षांत चर्चेत आलेल्या आणि अगदी मुंबईतही लावल्या गेलेल्या मियावाकी जंगलांची लागवड आनंदवनात काही जागी केली गेली आहे. त्या पद्धतीत नमूद केल्यानुसार सर्व परिमाणे सांभाळल्याने आनंदवनातील मियावाकी जंगले तीन वर्षांत स्वयंपूर्ण झाली आहेत, इतकेच नव्हे तर काही प्राण्यांनी या जंगलांची निवड अधिवासासाठी केली आहे. निसर्गाचे असे सान्निध्य मिळायला तुम्ही वैज्ञानिक पद्धतीने वृक्ष लागवड व त्यांची जोपासना करायला हवी.

– दिलीप हेर्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.