scorecardresearch

कुतूहल : वारा गाई गाणे..

जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या, पाने हलतात आणि ‘स्स्सस्स्स’ असा आवाज ऐकू येतो.

दोन ओठांचा चंबू करून त्यातील बारीकशा फटीतून फुंकर मारली की शिट्टी वाजते, हे आपल्याला माहीत आहे. कधी ट्रॅफिक पोलिसाने वाजवलेली शिट्टी आपल्या कानी पडते; प्रेशर कुकरची शिट्टी तर आपण अनेकदा ऐकतो. पण शहरातल्या वर्दळीपासून जरा लांब गेल्यावर वाऱ्याने घातलेली शीळदेखील आपल्याला ऐकू येते.

वारा म्हणजे वाहणारी, प्रवाही असलेली हवा. आपल्या डोळय़ांना हवा दिसत नाही; त्यामुळे आपण वारा पाहू शकत नाही. मात्र त्याचे परिणाम दिसतात. वाऱ्यामुळे वनस्पतींची पाने हलत असल्याचे दिसते. जास्त वेगवान वारा असेल तर झाडांच्या फांद्या हलताना दिसतात. पण, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलात तर चक्क वारा ऐकू येतो. लक्षपूर्वक ऐकल्यास वाऱ्याची शीळ कानी पडते.

वाऱ्यामुळे शिट्टीसारखा आवाज ऐकू येण्यामागे दोन-तीन प्रमुख कारणे आहेत. वाऱ्याचा वेग किती आहे आणि तो कोणत्या प्रकारच्या वस्तूंमधून वाहत आहे, यानुसार वाऱ्यामुळे वेगवेगळय़ा प्रकारचे आवाज निर्माण होतात. उदाहरणार्थ, उंचच उंच उभ्या वाढलेल्या बांबूच्या बनातून जेव्हा वारा वाहतो तेव्हा दोन बांबूंच्या दरम्यान असलेल्या अरुंद जागेतून तो गेल्यामुळे शिट्टीसारखा उच्च स्वरातला आवाज निर्माण होतो. पिंपळाच्या पानाची ‘सळसळ’ हे आणखी एक वैशिष्टय़पूर्ण उदाहरण. वारा वाहतो तेव्हा िपपळाची पाने वेगाने हलतात आणि एकमेकांवर घासली जातात. या घर्षणामुळे आणि पानांच्या हालचालींतून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे ध्वनीची निर्मिती होते. जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या, पाने हलतात आणि ‘स्स्सस्स्स’ असा आवाज ऐकू येतो.

वाऱ्याचा वेग जास्त असेल तर वस्तूंचे कंपन आणखी वेगाने होऊ शकते. एखादी वस्तू जितक्या वेगाने कंप पावते, तेवढी आवाजाची पट्टी (पीच) जास्त असते. वादळात वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो. वेगाने वाहणारा वारा शहरांमधल्या उंच इमारतींच्या दरम्यान असलेल्या जागेतून जोराने जाऊ लागला तरी त्या घोंघावणाऱ्या वाऱ्याचा शिट्टीसारखा आवाज ऐकू येतो. इतकेच कशाला, आजूबाजूला शांतता असेल आणि दरवाज्याच्या बारीकशा फटीतून वाऱ्याची झुळूक वेगाने आत येत असेल, तरी वाऱ्याने घातलेली शिळ ऐकू येऊ शकते!           

झाडे ही जणू ‘नैसर्गिक वाद्ये’च आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बासरीतून फुंकर मारल्यावर जसे वेगवेगळे स्वर आपण काढू शकतो अगदी त्याचप्रमाणे झाडांमधून वारा वाहताना वेगवेगळय़ा प्रकारचे आवाज ऐकू येतात, म्हणूनच तर लता मंगेशकर यांनी गायलेल्या एका भावगीतात तरल स्वरात म्हटले आहे, ‘वारा गाई गाणे..’

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta kutuhal whistling wind sound zws

ताज्या बातम्या