रोहित पक्ष्यांचे पंख, ज्वालेसारखे लाल-केशरी रंगाचे, चित्ताकर्षक असतात म्हणून त्यांना आपण अग्निपंख म्हणतो. परंतु त्यांच्या पंखांचे हे रंग आनुवंशिक नाहीत. जन्मत: हे पक्षी मळकट पांढरे किंवा राखाडी रंगाचे असतात. खारट पाणी असणाऱ्या पाणथळी, खाड्या हे त्यांचे आवडते अधिवास आहेत. तेथे उपलब्ध असणाऱ्या नीलहरित शैवाल, सूक्ष्म शैवाल, वनस्पती प्लवक, कोळंबी, कीटकांच्या अळ्या यांसारख्या खाद्यामुळे त्यांच्या पंखांवर हे रंग उमटतात!

रोहित पक्ष्यांचे मुख्य अन्नस्रोत आहे नीलहरित शैवाल. नीलहरित शैवालातील बीटा कॅरोटीन, अॅस्टाझंथिन सारखी लाल रंगद्रव्ये, अन्नपचन झाल्यावर त्यांच्या शरीरातील ऊती व चरबीयुक्त पेशींमध्ये साठतात आणि कालांतराने त्यांच्या पंखांवर हे रंग दिसू लागतात!

नीलहरित शैवाल हे शैवाल नसून हे बॅक्टेरियासारखे सूक्ष्मजीव आहेत. त्यांच्यात क्लोरोफिल आणि फायकोसायनिन (निळसर रंगद्रव्य) असल्याने निलहरित शैवाल असलेले पाणी निळसर हिरवे, हिरवट तपकिरी दिसते; त्यामुळे हे एक प्रकारचे शैवाल आहे, अशी समजूत होती. त्यांचे अनौपचारिक नाव आजही नीलहरित शैवाल असे आहे. समुद्र, खाडी किंवा गोड्या पाण्यात आढळणारे हे सूक्ष्मजीव, शैवाल, बुरशी किंवा समुद्रातील प्राण्यांसह त्याच अधिवासात जगतात.

नीलहरित शैवाल हे सूक्ष्मजीव सायनोबॅक्टेरिया प्रकारात मोडतात. ते आदिकेंद्रकी आहेत, म्हणजे त्यांच्या पेशींना केंद्रक नाही. त्यांच्यात क्लोरोफिल असल्याने ते प्रकाशसंश्लेषण करू शकतात. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर सर्वात प्रथम मुक्त ऑक्सिजन पृथ्वीवर निर्माण करणारे सायनो बॅक्टेरियाच होते. ऑक्सिजनच्या निर्मितीनंतर पृथ्वीच्या वातावरणात इतर सजीवांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार झाले. वैज्ञानिकांनी जीवाश्मांच्या अभ्यासातून ‘हे सूक्ष्मजीव पृथ्वीवरील सर्वांत पुरातन सूक्ष्मजीव आहेत’, असा निष्कर्ष काढला.

कॅरोटीनॉइड या रसायनात लाल रंगाचे अॅस्टाझंथिन असतात. त्यामुळे आपली त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते. सायनो बॅक्टेरियाच्या अनेक प्रजाती आहेत, त्यापैकी अर्थ्रोस्पायरा प्रजाती वापरून बनलेले स्पायरूलीना, अंतराळवीरांना रोगप्रतिकारक, पोषक आहार म्हणून देण्यात येते. त्यात प्रथिने, खनिजे व अँटीऑक्सिडंट भरपूर असतात.

याशिवाय जैविक इंधने, जैविक खते, औषधे, प्रसाधने बनवण्यासाठी सायनोबॅक्टेरियाचा वापर होतो. दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी, ऑक्सिजन निर्मितीसाठी व वातावरणातील कार्बन शोषून घेऊन पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी हे सूक्ष्मजीव उपयोगी पडतात. रासायनिक व वैद्याकीय अनुप्रयोगांसह हे जिवाणू जैव क्रियात्मक रेणू तयार करतात. त्यातून प्रतिजैवके, वायरसमुळे होणारे आजार व इतर अनेक आजारांवर औषधनिर्मितीसाठी सायनोबॅक्टेरिया वापरले जातात.

डॉ. श्वेता चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org