scorecardresearch

साम्ययोग : स्त्रीशक्ती आणि गीता

गीता प्रवचने, गीताई चिंतनिका, स्थितप्रज्ञ दर्शन, या ग्रंथांमधे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सखोल विवेचन केल्याचे दिसते.

अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

गीता आणि स्त्रिया, असे म्हटले की बरेचदा आक्षेपांची एक यादी समोर येते. सोबत युद्ध, वैश्य, शूद्र, चातुर्वण्र्य, यासारख्या शब्दांचाही उल्लेख होतो. गीता हा हिंसेचा, विषमतेचा पुरस्कार करणारा ग्रंथ आहे, अशीही टिप्पणी केली जाते.

गीतेत स्थितप्रज्ञ आहे. योगी आहे. भक्त आहे. हे सगळे ‘पुरुष’( पुल्लिंगी या अर्थाने ) आहेत. गीतेत स्त्रियांना काही स्थान आहे की नाही? विनोबांना हा प्रश्न एका विदेशी महिलेने विचारलाही होता. त्यांनी त्यावर मजेशीर उत्तर दिले होते. ‘या सर्व पुरुषांना पोटात कुणी घेतले आहे गीतेनेच ना? आणि गीता शेवटी कोण आहे?’

पुढे त्यांनी असेही सांगितले की ‘तो’, ‘ती’ ही कायद्याची भाषा झाली. अध्यात्मात असा विचार केला जात नाही. असे सूचक आणि समर्पक उत्तर देऊन विनोबा थांबले नाहीत. या आणि अशा प्रकारच्या विविध आक्षेपांवर त्यांनी, गीता प्रवचने, गीताई चिंतनिका, स्थितप्रज्ञ दर्शन, या ग्रंथांमधे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सखोल विवेचन केल्याचे दिसते.

या विवेचनामागे केवळ आक्षेपांचे खंडन एवढाच हेतू नाही. या भाष्यांमधून साम्ययोगाची प्रस्थापना करावी अशी त्यांची भूमिका दिसते. खंडन आणि मंडन या पारंपरिक चर्चेच्या रीतीपेक्षा समन्वय आणि ऐक्य अशी या प्रतिपादनाच्या मागची भूमिका आहे. तिचा संदर्भ वेळोवेळी घ्यायचा आहेच.

तरीही विनोबांनी आक्षेपांच्या अनुषंगाने केलेले सर्व विवेचन म्हणजे ‘समर्थन’ आहे, असे वाटून ते कुणाला अमान्यही होईल. मात्र गीतेवर आक्षेप आहेत याची त्यांना जाणीव होती. तसेच त्यांचे निराकरण केल्याखेरीज पुढे जाता येणार नाही याचीही कल्पना त्यांना होती, ही गोष्ट मान्य करावी लागते.

गीतेने स्त्रियांना सात शक्तींच्या रूपात पाहिले आहे. तो संदर्भ असा –

मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्।

कीर्ति: श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति: क्षमा॥

१० – ३४॥

सर्व-नाशक मी मृत्यु होणारा जन्म मी असें

वाणी श्री कीर्ति नारींत क्षमा मेधा धृति स्मृति ॥

दहाव्या म्हणजे विभूतियोगाच्या अध्यायात हा उल्लेख येतो. या अध्यायावर प्रवचन ( गीता प्रवचने ) देताना विनोबांनी सारी सृष्टी एखाद्या कुशल कलावंतासारखी चितारली आहे. ते स्वत: चित्रकार होते आणि त्यांना कलेचा वारसाही लाभला होता. हे सुंदर वर्णन अनुभवताना या शक्तींचा उल्लेख आढळत नाही. ते विवेचन १९६० मधे प्रवचनांच्या रूपात आले. थोडक्यात गीता प्रवचने आणि गीताई नंतर जवळपास तीन दशकांनी. तोवर विनोबांनी या सप्तशक्तींचे अध्ययन आणि प्रयोग या दोन्ही पातळय़ांवर शोधन केले होते. या प्रदीर्घ चिंतनानंतर विनोबांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीवर (कस्तुरबा ग्राम, इंदूर येथे) ही प्रवचने दिली. या शक्तींचा उगम गीतेमधे आहे हे उघडच दिसते. तथापि विनोबांच्या या विवेचनाला वर्तमानाचाही संदर्भ होता. या प्रवचनांच्यानंतर विनोबांनी जे कार्य केले ते स्त्री शक्तीच्या आणि एकूण समाज जागृतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. ही प्रवचने मध्यभागी ठेवून विनोबांचे सर्व कार्य पाहता येईल इतके त्यांचे महत्त्व आहे. या प्रवचनांचा प्रत्यक्ष परिचय पुढच्या लेखात.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog feminist interpretation bhagavad gita vinoba bhave philosophy zws

ताज्या बातम्या