प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंची मोजणी करण्यासाठी विषाणूंना जिवंत पेशींच्या माध्यमावरती वाढविले जाते. हे दोन प्रकारे साध्य करता येते. एक तर फलन झालेले कोंबडीचे अंडे वापरून किंवा दुसरे म्हणजे ऊती-संवर्धन तंत्राने प्राणीपेशींपासून तयार केलेला पेशीपापुद्रा वापरून. आपण कोंबडीच्या फलित अंड्यात विषाणूंची वाढ आणि त्यांची मोजमाप कशी करतात, हे बघूया.

अर्नेस्ट गुडपाश्चर या शास्त्रज्ञाने १९३१ साली प्रथमच कोंबडीच्या फलित अंड्यातील विषाणूंची मोजणी करण्याचा प्रयत्न केला होता. अंडे वापरण्याचा प्रमुख फायदा असा की, त्यात विविध प्रकारच्या पेशी, पापुद्रे व पोषकद्रव्ये असतात. विविध विषाणूंच्या वाढीसाठी अंड्यातील चार मुख्य भाग वापरले जातात, ते पुढीलप्रमाणे

१. जरायु-अपरापोषिका पटल (कॉरिओअॅलेंटॉइक मेंब्रेन): याचा वापर प्रामुख्याने पॉक्स किवा हर्पिस सिम्प्लेक्स या दोन विषाणूंच्या प्रजननासाठी केला जातो.

२. उल्बगुहा (अॅम्निऑटिक कॅव्हिटी): या भागात इन्फ्लुएन्झा आणि मम्प्स या विषाणूंची वाढ चांगली होते.

३.अपरापोषिका गुहा (अॅलेंटोइक कॅव्हिटी): इन्फ्लुएन्झा, पेरामिक्झो, यलो फिवर आणि रेबीज या प्रकारच्या विषाणूंची वाढ यावर चांगली होते.

४. पीतक कोश (योक सॅक): सस्तन प्राण्यांमधील विषाणूंच्या वाढीसाठी याचा वापर करतात.

विषाणूयुक्त द्रव अंड्यात कसा टोचला जातो ते बघूया. प्रथम साधारण ७ ते १२ दिवसांचे फलित अंडे प्रकाशझोतात धरून त्यातील विविध पापुद्र्यांचे बारकाईने अवलोकन केले जाते. या तंत्राद्वारे फलित आणि अफलित अंडे यातील फरकदेखील स्पष्ट दिसू शकतो. याला कॅण्डलिंग असे म्हणतात. नंतर अंड्याच्या रुंद भागाकडील कवच कात्रीच्या साहाय्याने कापून हवेची पोकळी मोकळी केली जाते. कापलेला भाग टोपीसारखा पुन्हा ठेवता येईल, अशा पद्धतीने कापला जातो. आता पोकळीमधील पापुद्र्यातून सिरिंजच्या साहाय्याने विषाणूयुक्त द्रव निर्जंतुक वातावरणात अंड्यामधील योग्य त्या भागात टोचून कवचाची कापलेली टोपी

जिलेटीन किंवा मेणाच्या साहाय्याने चिकटवून अंडे हवाबंद केले जाते. हे अंडे ३६ अंश सेल्शिअस तापमानाला २ ते ३ दिवस उबवले जाते. फलित अंड्यातील गर्भ विषाणूंच्या वाढीमुळे मृत झालेला असतो. अंड्याचे कवच फोडून त्यातील पापुद्रा निरीक्षणासाठी बाहेर काढला जातो. विषाणू ज्या ठिकाणी वाढतो, त्या ठिकाणी पांढऱ्या-राखाडी रंगाचे अपारदर्शक ठिपके स्पष्ट दिसू लागतात. याला पॉक्स असे म्हणतात. प्रत्येक विषाणू एक ‘पॉक्’ तयार करतो. याला ‘पॉक् फॉर्मिंग युनिट’ असे म्हणतात. पॉकचे आकार आणि रंग हे विषाणूच्या प्रकारानुसार थोडेफार बदलतात.

– डॉ. रंजन गर्गे मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org