– वैशाली पेंडसे-कार्लेकर vaishali.karlekar1@gmail.com

‘आधी त्याचं नाव अ‍ॅड  कर, मग पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी ट्राय कर आणि नंतर शॉपिंग कर.’ आजकाल आपल्या सर्वाच्या कानावर असे अनेक संवाद पडतात. पण अशा संवादांत तुम्ही काही ‘नोटीस’ केलं का? केलंही असेल. ते म्हणजे आपल्यापैकी अनेक जण असा इंग्रजी शब्दाचा आधार घेऊन, पुढे मराठी क्रियापद जोडून वाक्य तयार करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा वेळी बरेचदा आधी एखादा इंग्रजी शब्द आणि त्यापुढे ‘करणे’, ‘होणे’, ‘देणे’, ‘लावणे’, ‘शकणे’ अशा प्रकारच्या काही मोजक्या क्रियापदांचा सहायक म्हणून वापर करून वाक्य पूर्ण होतं. उदा. ‘अ‍ॅड कर’ यामध्ये ‘अ‍ॅड’ हा क्रियावाचक इंग्रजी शब्द आणि ‘कर’ हे मराठी क्रियापद वापरलं, की वाक्य सहज पूर्ण करता येतं. खरं तर ‘अ‍ॅड कर’  यासाठी मराठीत ‘वाढव’ हे क्रियापद आहे. पण ते लक्षात घेण्यापेक्षा हे इंग्रजी-मराठी मिश्रण पटकन वापरलं जात आहे. सर्व बाजूंनी आपल्याला वेढून असलेल्या इंग्रजी भाषेमुळे हा परिणाम होत आहेच, पण त्याबरोबर मराठीतल्या कमी संख्येने असलेल्या क्रियापदांमुळेही इंग्रजीचा वापर वाढत आहे. कोशांचे संदर्भ आणि सर्वसाधारण निरीक्षणावरून लक्षात येतं, की इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीच्या शब्दसंग्रहात क्रियापदांची संख्या खूपच कमी आहे. जुन्यांपैकी अनेक क्रियापदं हळूहळू मागे पडत गेली आणि त्या प्रमाणात नवीन क्रियापदं वाढलेली नाहीत. अशा वेळी मराठीत आधीच असलेली क्रियापदं जाणीवपूर्वक वापरण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांचा अर्थविस्तार करून  नवीन संकल्पनांसाठीसुद्धा ती वापरणं हा एक मार्ग आहे. याचबरोबर नवी क्रियापदं घडवणं हेही महत्त्वाचं आहे. उदा. उत्पादणे, आदरणे, क्रोधणे, नमस्कारणे अशी काही जुनी, काही नवी क्रियापदं प्रचारात आणू शकतो. अर्थात यासाठी नवीन क्रियापदनिर्मितीचं आणि क्रियापदकोशाचं आव्हान आपण पेलायला हवं. सुरुवातीच्या उदाहरणाप्रमाणे इंग्रजी, हिंदी तसंच मराठीच्या काही बोलींच्या साहचर्याने ‘आणू शकतो’, ‘येऊन जा’ ‘देऊन दे’ अशा संयुक्त क्रियापद असलेल्या किंवा नाम आणि क्रियापद अशी जोडी असलेल्या रचनांचं प्रमाणही आजच्या मराठीत वाढलं आहे. क्रियापदं तयार करताना ती मराठी भाषकांकडून वापरली जावी, यासाठी हेही लक्षात ठेवायला हवं. या विषयावर आणखी मुद्दे  पुढच्या लेखात.