scorecardresearch

भाषासूत्र : एकमेकांची ‘रूपे’ आणि चुकीचे ‘बरोबर’

तुम्ही दोघी मैत्रिणी आहात. एकमेकांना मदत करणे तुमचे कर्तव्य आहे’ हे वाक्य चुकीच्या शब्दयोजनेमुळे सदोष आहे.

– यास्मिन शेख

हे वाक्य वाचा- ‘तुम्ही दोघी मैत्रिणी आहात. एकमेकांना मदत करणे तुमचे कर्तव्य आहे’ हे वाक्य चुकीच्या शब्दयोजनेमुळे सदोष आहे. एकमेकांना-  मूळ शब्द एकमेक, अर्थ आहे परस्पर, अन्योन्य.  हे विशेषण आहे. पण या विशेषणाची सामान्यनामासारखी वाक्यात योजना करता येते, ज्या नामासाठी ते योजिले आहे त्या नामाच्या लिंग, वचनप्रमाणे त्याचे रूप बदलते. दोन पुरुष, दोन मित्र किंवा भाऊ इ.च्या संदर्भात एकमेकांना असे पुल्लिंगी रूप होते. दोन स्त्रिया, मुली, मैत्रिणी इत्यादींच्या संदर्भात एकमेकींना असे स्त्रीलिंगी रूप होते. लहान मुले, बाळे या नपुंसकिलगी शब्दांच्या संदर्भात एकमेकांना असे नपुंसकिलगी रूप होते. जसे दोन पुरुष- त्या दोघांनी परस्परांशी बोलणे टाळले. दोन बाळे- या बाळांचे एकमेकांना मारणे चालूच आहे, अशी वाक्ये. मात्र आपण उदाहरणादाखल घेतलेले वाक्य दोन स्त्रियांच्या संदर्भात आहे. ते असे हवे- ‘तुम्ही दोघी मैत्रिणी आहात. एकमेकींना मदत करणे तुमचे कर्तव्य आहे.’

आणखी एक चुकीची शब्दयोजना अनेकांच्या बोलण्यात आणि लेखनातही होत असते. हे वाक्य वाचा- ‘तू त्याच्यासोबत अजिबात बोलू नकोस.’ या वाक्यात ‘त्याच्यासोबत बोलणे’ ही चुकीची शब्दयोजना आहे. ‘त्याच्यासोबत’ याऐवजी ‘त्याच्याशी’ हा शब्द योग्य आहे. हे वाक्य असे हवे- ‘तू त्याच्याशी अजिबात बोलू नकोस.’ असेच आणखी एक वाक्य ऐकू येते- ‘तो तिच्याबरोबर खूप प्रेम करतो.’-  अचूक वाक्य अर्थातच, ‘तो तिच्यावर खूप प्रेम करतो.’ 

‘स्र’ कुठे आणि ‘स्त्र’ कुठे?

काही शब्दांच्या उच्चारात आणि लेखनात होणाऱ्या काही चुकांकडे दुर्लक्ष करू नये. स्र आणि स्त्र या अक्षरांची फोड अशी आहे. – स्र = स+र, स्त्र = स +त +र आता पुढील शब्द वाचा. सहस्र ऐवजी सहस्त्र लिहिल्यास स्त्र हे चुकीचे अक्षर ठरते. अजस्र (स्त्र 5), हिंस्र (स्त्र 5), स्राव ऐवजी स्त्राव चुकीचे रूप. आता स्त्र अक्षर असलेले काही शब्द- अस्त्र, शस्त्र, शास्त्र, इस्त्री, स्त्री, वस्त्र या शब्दांतील स्र आणि स्त्र यांच्या बिनचूक योजनेमुळे भाषेवर होणारे अनेक अन्याय टळतील.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi language learning pronunciation of correct marathi word

ताज्या बातम्या