मराठी माणसे बोलताना आणि लिहितानाही हिंदी भाषेतील काही शब्द जसेच्या तसे स्वीकारतात. हिंदीत त्या शब्दांचे जे अर्थ आहेत, ते मराठीतील त्याच शब्दांचे अर्थ असतात, असे मानणे चुकीचे आहे. अर्थ वेगळे असले, तरी त्या परभाषेतील अर्थानेच आपण मराठी बोलताना व लिहितानाही त्या शब्दांचा वापर करतो. असे करणे म्हणजे आपणच आपल्या भाषेला विद्रूप करतो.
आता पुढील वाक्य पाहा – ‘मला गर्व आहे, की मी भारतीय आहे’. हिंदी भाषेत ‘गर्व’ या शब्दाचा अर्थ ‘योग्य अभिमान’ असा आहे. मराठीत तोरा, अहंकार, उद्दामपणा. मराठीत म्हण आहे – ‘गर्वाचे घर खाली’. ‘गर्विष्ठ’ या विशेषणाचा अर्थ आहे – अत्यंत अहंकारी, उन्मत्त. ‘ग’ची बाधा या शब्दप्रयोगात ‘ग’ म्हणजे गर्व. गर्व या दुर्गुणामुळे होणारी मानसिक बाधा. बाधा म्हणजे पीडा, त्रास, विकार. मराठीतील या शब्दाचे अर्थ लक्षात घेतल्यास वरील वाक्याचा अर्थ होईल – ‘मला दुरभिमान, अहंकार आहे, की मी भारतीय आहे.’ – म्हणजे अर्थाचा अनर्थ! हे वाक्य असे हवे – ‘मला अतिशय अभिमान वाटतो, की मी भारतीय आहे’.
हे वाक्य वाचा – स्वर्गीय इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या स्त्री प्रधानमंत्री होत. स्वर्गीय हा शब्द. हिंदी भाषेत ‘स्वर्गीय’ हा शब्द मृत व्यक्तीचा उल्लेख करताना योजतात.
मराठीत ‘स्वर्गीय’ या विशेषणाचा अर्थ आहे – दिव्य, स्वर्गलोकातील. (हेवनली, डिव्हाइन) स्वर्गीय सुख, स्वर्गीय आनंद म्हणजे पृथ्वीवर न लाभणारे असे सुख, स्वर्गातच लाभणारा असा आनंद – आत्यंतिक सुख किंवा आनंद. मराठी शब्दाचा अर्थ डावलून हिंदीतील अर्थाचा स्वीकार करणे हे मराठी भाषेचे दुर्दैव!
हे वाक्य असे हवे. ‘स्वर्गवासी (स्व.) इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या स्त्री प्रधानमंत्री होत.’ स्वर्गवासीचे संक्षिप्त रूप स्व., कैलासवासी (कै). कै. हा शब्दही मृत व्यक्तीच्या संदर्भात योजतात. त्यामुळे वारंवार ऐकू येणारे आणि वाचनात आढळणारे वाक्य ‘स्वर्गीय’ इंदिरा गांधी… प्रधानमंत्री होत.
‘स्वर्गीय’ हा शब्द पूर्णपणे वगळणे, नष्ट करणे आवश्यक आहे.
मला मराठी भाषकांना अशी विनंती करायची आहे, की कृपा करून परभाषेतील शब्दांच्या चुकीच्या अर्थाचा स्वीकार करू नका. आपल्या भाषेवर आपणच असा अन्याय करणे योग्य नाही.
– यास्मिन शेख