कुतूहल – सदैव सनिका पुढेच जायचे..

आस्थापनाच्या ध्येयाची संकल्पना स्पष्ट करणारे ब्रीदवाक्य हे एक प्रेरणादायी दस्तऐवज असं म्हणावयास हवं

मार्केटिंग करणाऱ्यांचं सादरीकरण कौशल्य, सुयोग्य वेशभूषा, संभाषण चातुर्य, आत्मविश्वास प्रदर्शित करणारं प्रसन्न व्यक्तिमत्त्व. असे सर्व जुळून येताच सादरीकरण उत्तम होते.

आस्थापनाच्या ध्येयाची संकल्पना स्पष्ट करणारे ब्रीदवाक्य हे एक प्रेरणादायी दस्तऐवज असं म्हणावयास हवं. यामध्ये आस्थापनाच्या कार्याचं आणि भविष्यातील दृष्टीबद्दलचं समर्पक सारच. पण थोडक्यात हवं. संपूर्ण चमूला प्रेरणा देणारे एक प्रभावी साधन म्हणून याकडे बघितलं जातं. वस्त्र निर्मिती उद्योगातील मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून बघूया. आपलं स्वप्नवत ध्येयवाक्य काय असावं? व्यावसायिक सभा हा मार्केटिंगसाठीचा महत्त्वाचा दुवा. अशा सभा मोठय़ा व्यावसायिक आस्थापनाबरोबर असोत अथवा विक्री साखळीतील भागीदारांबरोबर असोत सादरीकरण करण्यासाठी विविध माहितीपित्रका, नमुने, सादरीकरण इत्यादी सर्व दिमतीला असतेच. त्याबरोबरच असावं मार्केटिंग करणाऱ्यांचं सादरीकरण कौशल्य, सुयोग्य वेशभूषा, संभाषण चातुर्य, आत्मविश्वास प्रदर्शित करणारं प्रसन्न व्यक्तिमत्त्व. असे सर्व जुळून येताच सादरीकरण उत्तम होते. वास्तवतेस आस्थापनाच्या ‘गुणवत्ता अभिमुखतेची’ ग्वाही मिळताच हे सर्व कसं नकळत, नसíगक आणि भारदस्त बनून जातं. आस्थापनाने गुणवत्ताभिमुख धोरण राबवणं नव्या युगातील आव्हानांना सामोरे जाऊन भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी खूपच गरजेचं बनलं आहे. आपल्या विक्री साखळी भागीदारांबरोबर विविध माध्यमातून साधता येणारा सुसंवाद हेच मार्केट्सचे ध्येय. गुणवत्ताभिमुख धोरण आखणे आणि अमलात आणणे हे वाटतं तेव्हढं सोपे नाही. यासाठी निर्मिती प्रक्रियेतील सर्वाचा सहभाग आवश्यक तर आहेच, त्याचबरोबर विविध स्तरांत प्रशिक्षणदेखील गरजेचं आहे. हे प्रशिक्षण काम करत असताना दिले जाणारे प्रशिक्षण, विश्वात शीघ्रतेने होत असलेल्या त्या त्या क्षेत्रातील बदलांचं ज्ञान देणारं असावं. परिसंवाद, कार्यशाळा यासाठी उपयुक्त असतात. विविध निर्मिती विभागांच्या सभांमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वाचाच आवाज ऐकला जाईल अशी दखल घ्यावी लागते. कारण काही व्यक्ती पुरेशा आत्मविश्वासाअभावी बोलू शकत नाहीत तर काही फाजील आत्मविश्वासापायी फुकटच इम्प्रेशन मारून जातात. गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी आणि उंचावण्यासाठी असा सर्वाचा ऐकलेला आवाज किमया करू शकतो. गुणवत्तेला प्राधान्य देत विविध निर्मिती विभागांत सुसूत्रता हवी. या सर्व प्रगतिशील मानसिकतेतून उभी राहील औद्योगिक आस्थापनातील कार्यरत, सर्वाची एकजिनसी गुणवत्ताभिमुख तसेच ग्राहकाभिमुख मिशन साकारणारी स्वप्नवत फौज. प्रत्येक सहभागी व्यक्तीच्या मुखातून आपोआपच येतील ध्येयवादी शब्द ‘सदैव सनिका पुढेच जायचे. न मागुती तुवा कधी फिरायचे’..
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

अभंगधारा – संस्थानांची बखर – ब्रिटिशअंकित म्हैसूर
ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्या फौजांमध्ये १७९९ साली झालेल्या चौथ्या युद्धाची अखेर म्हैसूरचा सर्वेसर्वा टिपू सुलतान याच्या मृत्यूने झाली. श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या या लढाईनंतर म्हैसूरच्या राज्यक्षेत्रातला मोठा प्रदेश कंपनी सरकारात सामील करून म्हैसूर आणि श्रीरंगपट्टणम्सभोवतालचा प्रदेश म्हैसूरचे खरे सत्ताधारी वोडीयार घराण्याच्या वारसाकडे सुपूर्द केला. ब्रिटिशांचे युद्धातले भागीदार मराठे आणि निजाम यांनाही काही प्रदेशाची मिळकत झाली. वोडीयार घराण्याचा कृष्णराज तृतीय या पाच वष्रे वयाच्या वारसाला ब्रिटिशांनी गादीवर बसवून पूर्णय्या या अनुभवी माणसाला दिवाणपद दिले आणि लेफ्ट. कर्नल बॅरी याला राज्यातील ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून नेमले. कृष्णराजाने आपली राजधानी १८०० साली श्रीरंगपट्टणम्हून परत म्हैसूर येथे हलविली. या काळात कंपनी सरकारने राज्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवून राजाबरोबर संरक्षण करार केला, आपली तनाती फौज म्हैसुरात राखून त्यासाठी खंडणी घेणे सुरू केले. इथपासून म्हैसूर हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील एक संस्थान बनले. सन १८३१ पासून म्हैसूरच्या राज्यकर्त्यांचे ब्रिटिशांशी संबंध बिघडल्यावर पुढील पन्नास वष्रे राज्याचे प्रशासन कंपनी सरकारने ताब्यात घेतले. या काळात कृष्णराज तृतीय आणि चामराजा वोडीयार दहावा हे केवळ नामधारी राजेपदावर होते. या काळात प्रमुख आयुक्त म्हणून नियुक्त झालेला मार्क कब्बन याने म्हैसूर संस्थानाला उत्तम प्रशासन दिले. कब्बनने प्रथम म्हैसूर संस्थानाची राजधानी बंगळुरू येथे नेऊन राज्याचे चार प्रशासकीय विभाग केले, १२० तालुके आणि ८५ तालुका न्यायालये स्थापन केली. कब्बन आणि बाविरग या दोन ब्रिटिश आयुक्तांनी संस्थानाच्या कारभारात सुसूत्रता आणून १८८१ साली प्रशासन परत वोडीयार घराण्याचा राजा चामराजा दहावा याच्याकडे सुपूर्द केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marketing point of view on textile production industry