आईनस्टाईनच्या मते, माणसाच्या मनातून निर्माण झालेले गणित, या विश्वाविषयी अचूक भाष्य करते हेच एक आश्चर्य आहे. त्याच मानवी मनातून निर्माण झालेल्या गणिताचा उपयोग मानसशास्त्रात होत आहे हेही नवलच! गणित आणि मानसशास्त्र यांचा एकत्रित अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे गणितीय मानसशास्त्र. या ज्ञानशाखेत मानसशास्त्राचा अभ्यास गणितीय प्रारूपांद्वारे होत असल्यामुळे मानसशास्त्रीय विश्लेषण आणि अनुमान यांना अचूकता व विश्वासार्हता प्राप्त होते.

व्यक्तिगत कारकीर्द निवडीसाठी कल, नेतृत्व क्षमता जाणून घेण्यासाठी बुद्धय़ांक, भावनांक असे निर्देशांक गणिती पद्धतींनीच काढले जातात. आपली भाषा मनातले विचार आणि भावना व्यक्त करते. म्हणून विशेष गणिती चौकटींद्वारे भाषाशास्त्राचा अभ्यास मोठय़ा प्रमाणावर केला जातो. अलीकडेच ‘भावना विश्लेषण’ (सेंटिमेंट अ‍ॅनेलेसिस) अशी नवी गणिती पद्धत विकसित झाली आहे. ग्राहक आपले उत्पादन किंवा सेवा याबद्दल कुठले शब्द वापरून सामाजिक माध्यमात चर्चा करीत आहेत हे या पद्धतीने समजून घेऊन उत्पादनात समुचित बदल केले जातात. कुर्ट ल्युईन या मानसशास्त्रतज्ज्ञाने माणसाचे वर्तन आणि स्वभाव या गोष्टी तो माणूस ज्या पर्यावरणात वाढतो, राहतो त्यावर अवलंबून आहेत असे तत्त्व मांडले. त्याच्या आधारे विस्तार झालेल्या सांस्थितिक मानसशास्त्र(टोपोलॉजिकल सायकोलॉजी) या उपशाखेत गणिताचा उपयोग होतो. खेळ कुठल्याही प्रकारचा असो, खेळाडूंसाठी मानसिक संतुलन राखून खेळणे तसेच प्रतिस्पर्ध्याच्या मनातील धोरणांचा विचार करून पावले उचलणे गरजेचे असते. त्यासाठी द्यूूतसिद्धांत (गेम थिअरी) ही गणिती शाखा उपयुक्त ठरते.

एखादे विधान  नेहमीच फक्त पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य असे नसते. त्या विधानातला सत्यांश किती प्रमाणात आहे ते फझी गणितात अंकीय मूल्यांद्वारे मांडले जाते. म्हणून मनाचे कार्य आणि त्याच्याशी निगडित वर्तन उलगडताना फझी गणिताचा चपखल उपयोग होतो. फझी गणिताच्या आणि फझी न्यूरल नेटवर्किंगच्या साहाय्याने निर्णय क्षमता, आकलन, मानसिक आरोग्य इत्यादींचा अभ्यास केला जातो. विविध घटकांचा विचार करून नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या नैराश्याची तीव्रता ठरविण्यात फझी गणितातील प्रतिमानांची मदत होते. मानवाचे मानसिक आरोग्य व त्याचा कार्यक्षमतेवर होणारा परिणाम यांचा सहसंबंध (कोरिलेशन) रेषीय समाश्रयण (लिनिअर रिग्रेशन) व कालक्रमिका विश्लेषण (टाइमसिरीज अ‍ॅनेलेसिस) अशा संख्याशास्त्रीय पद्धतींद्वारे अभ्यासला जातो. रूबिकघन, सोमाघन यांसारखे गणिती खेळ विचारांना चालना देण्यास व मनाची एकाग्रता वाढविण्यास मदत करतात. एकूण मानवी मनाचे खेळ जाणून घेण्यास आणि त्याची कार्यक्षमता वाढविण्यास गणित हे महत्त्वाचे साधन झाले आहे.

– मुक्ताई मिलिंद देसाई

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org