मक्केत जन्मलेल्या अबुल कलामांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद. त्यांच्या विद्वत्तेमुळे ‘अबुल कलाम’ म्हणजे वाचस्पती ही पदवी मिळून, धर्मपंडित या अर्थी मौलाना ही उपाधी लोकांनी दिली. बालवयापासूनच ते क्रांतिकारी विचारांचे, स्वातंत्र्यप्रिय म्हणून त्यांनी स्वतला नावाच्या शेवटी आज़ाद जोडले. सामान्यपणे मौलाना आज़ाद या नावाने ओळखल्या ज़ाणाऱ्या मोहिउद्दीन अहमद यांचा इस्लामी संस्कृती, साहित्य आणि ज़ागतिक घडामोडींचा सखोल अभ्यास होता. गांधीजींच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या मौलाना आज़ादांनी गांधीजींनी ब्रिटिश सरकारविरोधी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला आणि १९२० साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य झाले. १९२३ मध्ये दिल्लीत काँग्रेसचे विशेष सत्र झाले. त्याचे अध्यक्षपद मौलानांकडे होते. दांडी येथे गांधीजीप्रणीत मिठाच्या सत्याग्रहात मौलानांच्या सहभागामुळे त्यांना मेरठ जेलमध्ये तुरुंगवास झाला. १९४० साली रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात मौलानांची पुढच्या पाच वर्षांसाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅ. जीना आणि मुस्लीम लीग यांच्या मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला मौलानांचा विरोध कायम होता. ब्रिटिशांनी केलेल्या बंगालच्या फाळणीलाही त्यांनी कडाडून विरोध केला. हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि धर्मनिरपेक्ष राजकारण यासाठी झटणाऱ्या मौलानांनी फाळणीनंतर उसळलेला हिंसाचार शमविण्यासाठी पुढाकार घेतला. स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्यात त्यांचा सहभाग होता. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात १९४७ ते १९५८ अशी ११ वर्षे मौलाना आज़ाद केंद्रीय शिक्षणमंत्री होते. १९५२ ते १९५७ या काळात ते लोकसभेचे सदस्य होते.

शिक्षणमंत्रिपदाच्या कारकीर्दीत मौलानांनी शिक्षण व्यवस्थेचा पाया रचताना विश्वविद्यालय अनुदान आयोग म्हणजे यूजीसी आणि भारतीय प्रौद्योगिकी संस्थान म्हणजे आयआयटी स्थापन केले. त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी आणि ललित कला अकादमी यांच्या स्थापनेसाठी मौलानांचे प्रयत्न होते. मौलानांचा मृत्यू १९५८ साली झाला. १९९२ मध्ये मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा बहुमान केला गेला. ११ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maulana azad
First published on: 14-06-2018 at 02:16 IST