भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मॉन्सूनचा पाऊस पडतो. देशातील शेतकरी आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी हा पाऊस अतिशय महत्त्वाचा असतो. साहजिकच त्याचे आगमन केव्हा होईल आणि तो मात्रेत किती असेल, याबाबत जमेल तितका अचूक अंदाज मिळवणे, हे कृषी-पेरणी, जल-विद्युत प्रणाली व्यवस्थापन आणि अनेक क्षेत्रांसाठी कळीचे ठरते. तसेच मॉन्सून परत फिरून केव्हा संपेल, याचा अंदाजदेखील पूरनियंत्रण योजना आखण्यासाठी उपयुक्त ठरतो.

या संदर्भात एकूण पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी भारतीय हवामान खाते ‘दीर्घकालीन सरासरी (लाँग पीरियड एव्हरेज)’ ही संकल्पना पाया म्हणून वापरते. त्यासाठी १९५१ ते २००० या पन्नास वर्षांत भारतात पडलेल्या पावसाची ८९ सेंटिमीटर या सरासरीचा आधार घेतला जातो.

अशा दीर्घकालीन सरासरीच्या टक्केवारीच्या प्रमाणाला पुढील पाच प्रकारांत विभागले जाते :

१) ९० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाण म्हणजे अपुरा पाऊस

२)  ९० ते ९६ टक्के प्रमाण म्हणजे सामान्यपेक्षा कमी पाऊस

३) ९६ ते १०४ टक्के प्रमाण म्हणजे सामान्य पाऊस

४) १०४ ते ११० टक्के प्रमाण म्हणजे सामान्यपेक्षा अधिक पाऊस

५) ११० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण म्हणजे पावसाचे आधिक्य

तरी दीर्घकालीन सरासरीच्या ९७ टक्के प्रमाणात या वर्षी पाऊस पडणार; असा एप्रिल २०१७ मध्ये केलेला अंदाज, पावसाचे प्रमाण भारतात यंदा सामान्य असेल, असे सांगतो. २००६ ते २०१५ या दहा वर्षांत भारतीय हवामान खात्याने पावसाचा एप्रिलमध्ये वर्तवलेला अंदाज ५ टक्के कमी/अधिक, तर जूनमध्ये वर्तवलेला अंदाज ४ टक्के कमी/अधिक अशा फरकाने बरोबर असल्याचे आढळले आहे.

अर्थातच वर्तवलेला पावसाचा कल आणि एकूण देशासाठी केलेला अंदाज सहसा बरोबर आढळतो; पण प्रत्येक लहान क्षेत्रात किती आणि केव्हा पाऊस पडेल हे अचूकपणे वर्तवणे दुरापास्त आहे. वातावरणातील अतिशय मोठय़ा संख्येतील घटक आणि त्यांचे परस्पर गुंतागुतींचे संबंध तसेच सूक्ष्म  पातळीवर आकडेवारी उपलब्ध नसणे याला कारणीभूत आहेत.

भारतीय मॉन्सून ही जगातील सर्वाधिक क्लिष्ट हवामान व्यवस्था मानली जाते आणि त्यामुळे सातत्याने संशोधन करून त्याच्याशी निगडित अधिकाधिक घटक ओळखून त्यांचे मोजमापन करून पावसाबाबत बिनचूक भाकीत करण्याचे प्रयत्न जागतिक स्तरावर सुरू आहेत.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मास्ती वेंकटेश यांच्या काव्याची वैशिष्टय़े

मास्ती वेंकटेश अय्यंगार यांनी मूळ वाल्मीकी रामायणाचा अभ्यास केला होता. राम देवावतार नसून, मानव आहे. सदाचार व धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाने तो उच्चस्थानी पोहोचला आहे, हा दृष्टिकोन त्यांनी ‘श्रीराम पट्टाभिषेक’ (१९७२) या दहा हजार ओळींच्या महाकाव्यात मांडला आहे. यातील हनुमान, त्याचे साथीदार वानर नसून, मानवच आहेत. त्यात हनुमान समुद्र उल्लंघून नाही, तर समुद्र पोहून लंकेस जातो, असे दाखवले आहे. या काव्यातील सर्व पात्रे मानवरूपात दाखवली आहेत. या कथेत दशरथाची कथा-व्यथा सांगितली आहे. सुनीत व मुक्तछंदातील हे त्यांचे महाकाव्य प्रसिद्ध आहे.

या व्यतिरिक्त मास्तींनी भक्तिगीते, देशभक्तिपर कविता लिहिल्या आहेत. त्यांची भक्तिगीते हरिदास परंपरेतील आहेत. कर्नाटकात तेराव्या शतकाच्या शेवटी हरिदास पंथाचा उदय झाला. या पंथातील कवींनी अंधश्रद्धा व कर्मकांडावर टीका करून सदाचारपालनाचे महत्त्व साध्या व सहज भाषेत काव्यरूपात व्यक्त केले आहे. मास्तींनी अस्पृश्यता व जातियता यावर कडक टीका या प्रकारच्या काव्यातून केली आहे. मानव हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. ही श्रद्धा आणि जीवनातील मूल्यांवर संपूर्ण विश्वास ही त्यांच्या काव्याची वैशिष्टय़े आहेत. मास्तींनी एका संगीतकाराच्या जीवनाचे चित्रण करणारी सुबण्णा (१९३८) ही लघू कादंबरी लिहिली. ‘चेन्नबसव नायक’ (१९४९) आणि ‘चिक्कवीर राजेंद्र’ (१९५६) या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हैदर अलीने बिदनूरचे राज्य कसे गिळंकृत केले याची कथा ‘चेन्नबसव नायक’मध्ये आहे. बिदनूरच्या ‘नायक’ वंशाच्या पराजयाची आणि पतनाची ही कथा आहे. ही कथा एकाच वेळी राजकीय आणि वैयक्तिक अशा दोन स्तरांवर घडताना दिसते.

‘चिक्कवीर राजेंद्र’ ही मास्तींची प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे. मास्तींच्या लेखनाचं वैशिष्टय़ हे की मास्तींनी केवळ गतवैभवाच्या ऐतिहासिक आठवणींनाच शब्दबद्ध केलं नाही तर आपण ब्रिटिशांच्या कपटकारस्थानात, गुलामगिरीच्या फेऱ्यात कसे फसलो याचेही चित्रण केले आहे. आपला समाज, राजे, रजवाडे, त्यांचे विलासी जीवन, त्यांची कटकारस्थाने, त्यांचा स्वार्थीपणा या साऱ्याचा अभ्यास करून मास्तींनी साहित्यनिर्मिती केली आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.