इश्चरेचिया कोलाय जिवाणूमध्ये जनुकीय माहितीची देवाणघेवाण कशी होते हे अमेरिकन जिवाणूशास्त्रज्ञ जोशुआ लेडरबर्ग यांनी शोधून काढले. यासाठी त्यांना १९५८चे नोबेल पारितोषिक मिळाले. याला ‘कॉन्जुगेशन प्रक्रिया’ म्हणतात. काही प्रकारचे विषाणू, जिवाणू पेशींत घुसतात आणि संख्यावाढ करतात. विषाणूची जनुके जिवाणूच्या डीएनएमध्ये अंतर्भूत होऊन जिवाणूंचे गुणधर्म बदलू शकतात. हे गुणधर्म पुढील पिढ्यांत संक्रमित होतात. या ‘ट्रान्सडक्शन’ प्रक्रियेचा त्यांनी शोध लावला.

या प्रक्रिया जिवाणूसाठी केवळ ‘प्रजनन’ प्रक्रिया नसून ‘अनुकूलन’ प्रक्रिया म्हणूनदेखील परिणामकारक ठरतात. असे उत्परिवर्तीत सूक्ष्मजीव अवकाशातील अतिरेकी वातावरणाचा (रेडिएशन्स, निर्वात पोकळी, उच्च तापमान) सामना करत अस्तित्व टिकवू शकतात का, याचा अभ्यास करण्यासाठी लेडरबर्गनी ‘एक्झोबायॉलॉजी’- पृथ्वीबाहेर, अवकाशातल्या जीवांचा अभ्यास ही संज्ञा निर्मिली. नासाच्या १९६०मधील एक्झोबायॉलॉजी कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे लेडरबर्ग पहिले जीवशास्त्रज्ञ! अवकाश मोहिमांमधील अवकाशयाने पूर्णत: जंतूविरहित असावीत. पृथ्वीवरून अजाणतेपणेही अन्य ग्रहगोलांवर जीवप्रकार निर्यात होऊ नयेत, वा अन्य ग्रहगोलांवरून जीवप्रकार पृथ्वीवर आयात होऊ नयेत याची पूर्ण खबरदारी घेण्याचा आग्रह लेडरबर्गनी धरला.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जिवाणू आणि बुरशीच्या काही प्रजाती आढळून आल्या आहेत. अशनी आणि ग्रह यांच्यात सूक्ष्मजीवांचे आदानप्रदान होते. ‘लिथोपॅनस्पर्मिया’ हा त्यासंबंधीच्या अभ्यासाचा विषय आहे. अवकाशातील जिवाणूंमध्ये उत्परिवर्तन होऊन ते विशिष्ट प्रतिजैविकांना विरोध करतात असेही आढळून आले आहे. स्पेसवॉक करताना गोळा केलेल्या अवकाशीय धुळीतदेखील सूक्ष्मजीव आढळून आले आहेत. १९६० साली रशियाच्या उपग्रहातून इश्चरेचिया कोलाय, स्टाफिलोकोकस आणि एंटेरोबॅक्टेरिया या जिवाणूंवर पृथ्वीबाह्य वातावरणाच्या परिणामांचा अभ्यास केला गेला.

२०१८ मध्ये यामागिशी या जपानी शास्त्रज्ञाला डेइनोकॉकस रेडिओड्यूरान्स हे जिवाणू जमिनीपासून बारा किमीवर आकाशात आढळले. सर्वपेशीय मोठ्या रेणूंवर (मॅक्रोमॉलेक्युल्सवर) परिणाम करणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह ताणावर मात करण्याची क्षमता असलेल्या सर्व ज्ञात प्रजातींमध्ये डेइनोकॉकस रेडिओड्यूरान्स अतुलनीय आहे. ऑक्सिडेटिव्ह तणाव म्हणजे मुक्त मूलकांचे (फ्री रॅडिकल्स) तयार होणे आणि त्यांना निष्प्रभ करणे यातील असमतोल. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे कॅन्सर किंवा वृद्धत्व येते.

पाणी, हवा, उबारा, अन्न इत्यादींचाअभाव आणि जीवघेण्या प्रारणाला तोंड देतही ते जगतात. पृथ्वीपासून ४०० किलोमीटरवरच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर डेइनोकॉकस जिवाणू ४५ वर्षे जगू शकतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. जिवाणूंना अशा प्रकारच्या ताणाला तोंड द्यावे लागले तर ते त्यानुसार स्वत:त उत्परिवर्तन घडवून आणतात.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org