श्रुती पानसे contact@shrutipanse.com
माणसाचं माणूसपण राखण्याचं फार महत्त्वाचं काम आपल्या मेंदूतल्या न्यूरॉन्सच्या जोडण्या घडवून आणत असतात. या जोडण्या कशामुळे झाल्या, किती झाल्या, झालेल्या जोडण्यांपैकी किती टिकल्या यावरच आपलं माणूसपण अवलंबून आहे, हे शास्त्रीय सत्य आहे. या कामात मेंदूला अनेकांची मदत लागते. यातल्याच एक आहेत ग्लायल पेशी. न्यूरॉन्सना ग्लायल (glia / glial) नावाच्या पेशींची फार मदत होत असते. या ग्लायल पेशींचं अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे न्यूरॉन्सच्या आसपास राहणं. त्यांना वेढणं. ग्लायलचा अर्थ आहे ग्लू. चिकट द्राव. म्हणूनच या पेशी त्यांचं संरक्षण करतात. त्यांना जागेवर ठेवतात. न्यूरॉन्सच्या काळजीवाहक म्हणून त्या काम करतात. हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, कारण ग्लायल पेशी समजा नसत्या, तर न्यूरॉन्सच्या जोडण्या कदाचित झाल्याही असत्या, पण त्या टिकल्या असत्या असं काही सांगता येत नाही.
या काळजीवाहक पेशींचं महत्त्वाचं काम म्हणजे शरीरातली उत्तम पोषक द्रव्यं आणि ऑक्सिजन न्यूरॉन्सना पुरवण्याचं. त्यामुळेच न्यूरॉन्सच्या जोडण्या तंदुरुस्त राहतात. मेंदूच्या एकूण प्रकृतीसाठी चांगला आहार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय मेंदू नीट काम करू शकत नाही. ग्लायल पेशी आणखी एक महत्त्वाचं काम करतात ते म्हणजे जे न्यूरॉन्स अजूनही वापरात आलेले नाहीत किंवा मृत झालेले आहेत, त्यांची स्वच्छता करण्याचं कामही ग्लायल पेशी करत असतात. एखादं नुकसान झालं तर दुरुस्तीचं काम या पेशी करतात. मेंदूची गुंतागुंत एवढी आहे की या सर्व ग्लायल पेशींदेखील एकसारख्या, एका साच्यातल्या नसतात. त्यांचेही वेगवेगळे आकार- प्रकार असतात. त्या प्रकारांनुसार त्यांची कार्य चालू असतात.
आपण यापूर्वीच्या भागांत पाहिलं की न्यूरॉन्सच्या जोडणीवर मायलिन नावाचं एक आवरण तयार होत असतं. तोसुद्धा ग्लायल पेशींचाच एक प्रकार आहे. न्यूरॉन्सच्या जडणघडणीत या पेशी प्रामाणिक मदतनीसाचं काम निभावतात. त्यांच्या कार्यात थोडाही बिघाड झाला तर मेंदूच्या कामकाजात धोका निर्माण होतो. आहाराची- आहारावर अवलंबून असलेल्या रसायनांची योग्य काळजी घेतल्या मेंदूही तंदुरुस्त राहील.