– सुनीत पोतनीस

पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियाच्या अटलांटिक सागर किनारपट्टीतल्या दोन बंदरांमधून गुलामांचा व्यापार प्रथम पोर्तुगीजांनी सुरू केला. ब्रिटिशांनी नायजेरियाकडे पहिली मोहीम एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काढली. परंतु मोहिमेत तिथे पोहोचलेल्या मंडळींना ताप आणि पोटाचे विकार यांनी एवढे त्रस्त केले, की त्यांपैकी कसेबसे थोडेच परत आले. १८५० साली दक्षिण नायजेरियात लागोस येथे काही ब्रिटिश खलाशी आणि सैनिकांनी पहिली वसती केली. पुढे १८६१ साली ब्रिटिशांनी मोठी फौज आणून लागोस व त्याच्या आसपासच्या प्रदेशावर ताबा मिळवून, नायजेरियातली आपली पहिली वसाहत स्थापन केली. १८८४ मध्ये नायजेरियाच्या संपूर्ण किनारपट्टीवर वर्चस्व मिळवून ‘नायजर कोस्ट प्रोटेक्टोरेट’ या नावाने तिथले प्रशासन ताब्यात घेतले. याच दरम्यान, बर्लिन येथे झालेल्या परिषदेने ब्रिटनला संपूर्ण नायजेरियावर स्वामित्व स्थापन करण्याचे अधिकार दिले. नायजेरियातल्या ब्रिटिशांच्या वसाहती आणि संरक्षित प्रदेशांचे प्रशासन सांभाळण्यासाठी १८८६ साली ‘रॉयल नायजर कंपनी’ स्थापन करण्यात आली. पुढे सोकोटो आणि बोर्नु या राज्यांवर आक्रमण करून ब्रिटिशांनी नायजेरियाचा उत्तर प्रदेशही ताब्यात घेतला. अशा प्रकारे संपूर्ण नायजेरिया १९०० साली ब्रिटिश अमलाखाली येऊन त्यांची वसाहत बनला. यापूर्वी नायजेरियातील प्रशासनाचे ब्रिटिशांनी ‘नॉर्थ प्रोटेक्टोरेट’ व ‘सदर्न प्रोटेक्टोरेट’ असे दोन संरक्षित विभाग केले होते. १९१४ साली त्यांनी हे प्रदेश एकत्र करून एकसंध नायजेरिया ही ब्रिटिश संरक्षित, अंकीत वसाहत बनवली.

पूर्वापार या प्रदेशात तब्बल २५० वांशिक गटांचे, जमातींचे लोक राहतात. त्यांपैकी हौसा या जमातीचे लोक उत्तरेत, तर योरूबा आणि इग्बो या जमातींचे लोक दक्षिणेत बहुसंख्येने आहेत. अरबांच्या प्रभावामुळे उत्तरेत इस्लाम अधिक फोफावला, तर दक्षिणेत ब्रिटिश, पोर्तुगीजांमुळे ख्रिस्ती धर्माचा अधिक प्रसार झाला आहे.

sunitpotnis94@gmail.com