थंडी संपल्याची जाणीव होळीच्या आगमनाने होते. यंदा होळी तोंडावर आली तरी थोडीफार थंडी जाणवत आहे. पण या होळीच्या पूजनाचे पारंपरिक मार्ग आता पर्यावरणीय दृष्टिकोनातून बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हवेचा निर्देशांक धोक्याचा इशारा देत असताना, होळी सर्वत्र साजरी करून आपले शहरातील जीवन आपण अधिक धोकादायक बनवीत आहोत. दुसरे म्हणजे मुख्यत: वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्ती यांना या प्रदूषणाचा त्रास होतो. मात्र, आपण हा सण पर्यावरणनिष्ठ पद्धतीने साजरा केल्यास अनेक पटींत सुसह्य़ होऊ  शकतो.

त्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे, होळी सामुदायिक- शहरांत एका वॉर्डची एक होळी आणि ग्रामीण भागात एका गावाची एक होळी- असावी. कमी ज्वलन म्हणजे कमी प्रदूषण. वैयक्तिक, घरटी होळी रचण्यापेक्षा सामुदायिक होळीमुळे काही प्रमाणात प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

होळी हा यज्ञप्रकार आहे. यज्ञातील समिधा म्हणजे यज्ञात ज्वलनाला टाकलेले पदार्थ. यात सुके गवत, लाकूड, सुकलेल्या फांद्या, शेणी, प्रसादाचे अन्नपदार्थ यांचा समावेश योग्य. पण आजकाल होळीमध्ये प्लास्टिकच्या पताका आणि सजावटीच्या वस्तू, प्लास्टिकचा राक्षस, प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू, खेळणी, अपप्रवृत्ती दर्शवणाऱ्या प्लायवूडच्या प्रतिमा, आसपासचा वर्षभर साठवलेला सर्व कचरा, फर्निचर- विशेषत: फेनॉल व पॉलीमर बॉन्डेड फर्निचर, देवांच्या जुन्या प्रतिमा, जुने कपडे, फटाके.. अशाही वस्तू टाकल्या जातात. या सर्व वस्तू वेगवेगळ्या तापमानाला आणि अर्धवट जळाल्याने होळीतून प्रचंड प्रदूषण होते. तर झाडांच्या सुकलेल्या पानांमुळे जळते कण आसमंतात पसरतात. त्यामुळे होळीत या वस्तू पडणार नाहीत याची काळजी जरूर घ्यावी.

मध्यभागी एक जिवंत झाड किंवा मोठय़ा झाडाची फांदी रोवून त्याभोवती होळी रचली जाते. याला कोणताही शास्त्रीय वा पारंपरिक आधार नाही. आपण सुक्या लाकडाच्या ओंडक्यावरही होळी उभी करू शकतो. त्यामुळे होळीत जिवंत झाडांचा बळी देऊ  नये. होळीनंतर दुसऱ्या दिवशी शहरावर दिसणारा धुराचा ढग हा मानवनिर्मित असतो. तो आपण कमी करू शकतो. होळीचा आकार आणि संख्या कमी करू शकतो. प्रतीकात्मक होळी, सार्वजनिक होळी करू शकतो. आपण दिव्याच्या होळीची संकल्पना प्रत्यक्षात आणू शकतो का?

– विद्याधर वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org