फिलिपिन्सच्या बोहोल प्रांतात चॉकलेटी टेकड्या (चॉकलेट हिल्स) नावाचा जगावेगळा अतीव सुंदर असा टेकड्यांचा समूह आहे. बोहोल हे फिलिपिन्स द्वीपसमूहातील दहावे मोठे बेट असून, ते साधारणपणे फिलिपिन्सच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याच्या भोवती जी ७२ छोटेखानी बेटे पसरली आहेत, त्यांनी बोहोलचे सौंदर्य द्विगुणित केले आहे. चॉकलेटी टेकड्या हे पृथ्वीवरचे एक आकर्षक आणि असामान्य असे निसर्गलेणे आहे. लोबोक नदीच्या आजूबाजूला समुद्रसपाटीपासून साधारण १५० ते २०० मीटर उंचीच्या या प्रदेशात समूहातील टेकड्या पसरल्या आहेत.
या समूहात, ५० चौ. किमी प्रदेशात १,२६० टेकड्या ज्ञात असून त्यांची संख्या १,७७६ इतकी असावी अशी शक्यता आहे. गमतीचा भाग म्हणजे त्यांची नेमकी गणना अजूनही झालेली नाही! या सगळ्या चुनखडकांनी बनलेल्या टेकड्यांवर हिरवे गवत आहे; आणि ते कोरड्या ऋतूत तपकिरी दिसते, म्हणून त्यांना चॉकलेटी टेकड्या म्हटले जाते.
फिलिपिन्स देशाने या टेकड्यांना देशाचे तिसऱ्या क्रमांकाचे भूवैज्ञानिक स्मारक घोषित केले असून त्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश व्हावा म्हणून प्रस्तावही मांडला आहे. १९८८ मध्ये या टेकड्यांना राष्ट्रीय भौगोलिक स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. बोहोल प्रांताच्या ध्वजावर आणि शिक्क्यावरही या टेकड्यांना स्थान देण्यात आले आहे. अर्धगोलाकृती, शंकूच्या आकाराच्या उंचवट्यांच्या, गवताच्या गंजीसारख्या (हेकॉक) टेकड्यांचा हा सौम्य चढउतार असलेला प्रदेश आहे. टेकड्यांचे उंचवटे ३० ते ५० मीटर उंच असून सर्वाधिक उंची असणारा उंचवटा १२० मीटर उंच आहे. बोहोल प्रांतातील कॅरमेन, बातूआन आणि सगबायन शहरांमध्ये त्या पसरलेल्या आहेत. अजूनही या टेकड्या अर्धगोलाकृती कशामुळे होतात हे समजलेले नाही.
टेकड्यांच्या दरम्यान असलेल्या सपाट जमिनीवर भात व इतर नगदी पिके घेतली जातात. या टेकड्यांची अंतर्गत रचना बघितल्यावर असे लक्षात येते, की त्या चुनखडकाच्या अनेक थरांनी तयार झाल्या आहेत.
२५ लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत फिलिपिन्सचा हा प्रदेश समुद्राच्या पाण्याखाली होता. त्यानंतर झालेल्या भूपट्टांच्या (टेक्टॉनिक प्लेट्स) हालचालींमुळे समुद्रतळ खचल्याने समुद्रपातळी खाली जाऊन हा चुनखडकाचा प्रदेश वर आला. त्यावर प्रवाळ आणि शंख-शिंपल्यांचे प्रचंड मोठे संचयन झाले होते. या टेकड्या प्लायोसीन नावाच्या कालखंडाच्या (५३ लक्ष वर्षांपूर्वीपासून ते २५ लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत) उत्तरार्धात आणि नंतरच्या प्लाइस्टोसीन कालखंडाच्या सुरुवातीच्या काळात निक्षेपित (डिपॉझिटेड) झालेल्या सागरी चुनखडकाने बनल्या आहेत. यांत प्रवाळ, एकपेशीय वनस्पती, मृदुकाय संघातले (फायलम मॉलुस्का) प्राणी यांचे भरपूर जीवाश्म सापडतात.
– डॉ. श्रीकांत कार्लेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org