प्लास्टिकच्या भांडय़ांना भोक किंवा चीर पडली तर ते घरच्या घरी दुरुस्त करता येते का, असा प्रश्न अनेक जण विचारतात. प्लास्टिकमध्ये उष्मादृढ आणि उष्मामृदू असे दोन प्रकार असतात. उष्मादृढ प्रकाराने बनवलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंना चीर पडल्यास ते भांडे निकामी होते. तथापि बाजारात रबरापासून बनवलेली चिकट द्रव्ये मिळतात. त्याचा वापर करायला हरकत नाही. अशी वस्तू पाण्याच्या संपर्कात आली नाही तर ती वस्तू काही काळ टिकते. उष्मामृदू (थर्मोप्लास्टिक) प्रकारात अनेक प्रकारची प्लास्टिक मिळतात. त्यापासून बनवलेल्या वस्तूंना चीर पडली तर ती सांधण्यासाठी त्या त्या प्लास्टिकप्रमाणे रसायने वापरतात. उदाहरणार्थ, सिनेमा फिल्म ज्यापासून बनवतात, त्या सेल्युलोज अॅसिटेटच्या आणि सेल्युलोज अॅसिटेट ब्युरिटेटच्या (यापासून विचरायची फणी बनवतात) वस्तू सांधण्यासाठी अॅसिटोन हा ज्वालाग्राही पदार्थ वापरतात. पारदर्शक शोभेच्या वस्तू ज्यापासून बनतात, त्या अॅक्रिलिकला सांधण्यासाठी अॅसिटोन आणि इथाइल अॅसिटेट वापरतात. छोटे डबे ज्या पॉलिस्टायरीनपासून बनवतात, त्याला सांधण्यासाठी अॅसिटोन किंवा टोल्यून वापरतात आणि लेदरक्लॉथ व रेक्झिन ज्यापासून बनते, त्या पीव्हीसीला सांधण्यासाठी सायक्लोहेक्झेन वापरतात. अॅसिटोन किंवा टेट्राहायड्रोफ्युरान ही रसायने वापरून पुष्कळशा वस्तू सांधता येतात. या रसायनात प्लास्टिक विरघळत असल्याने सांधा मजबूत होतो. मात्र ही रसायने ज्वालाग्राही असल्याने ती काळजीपूर्वक हाताळावी लागतात. एरल्डाइट हे बाजारात मिळणारे रसायनसुद्धा वापरून प्लास्टिक योग्य प्रकारे सांधता येते.
मोटारीच्या बनावटीत ग्लास रिएन्फोर्सड् पॉलिएस्टर वापरून मोटारीच्या बॉडी तयार झाल्या आहेत. पत्र्याऐवजी प्लास्टिक वापरल्याने मोटारींचे वजन खूप कमी होते. त्याचप्रमाणे प्लास्टिक गंजत नसल्याने मोटारींना वारंवार रंग द्यावा लागत नाही. हे प्लास्टिक मजबूत असल्याने अपघातात सापडलेल्या ड्रायव्हरला धोका नसतो. मोटारीचे वजन कमी झाल्यामुळे कमी अश्वशक्तीचे इंजिन तर वापरता येतेच पण त्यामुळे इंधनाची गरजही कमी भासते.
अ. पां. देशपांडे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा – वॉकिंग मेडिटेशन
‘मला सगळे जण म्हणतात, तू मेडिटेशन कर म्हणजे तुझे सर्व शारीरिक, मानसिक आणि म्हणे आध्यात्मिक प्रश्न सुटतील. मी प्रामाणिकपणे खूप प्रयत्न केला, पण ते काही जमत नाही. म्हणजे आधी मांडीबिंडी घालून बसता येत नाही आणि मन तर xx असंय ना, की एके जागी स्थिरच राहत नाही. मी ओंकार (बिंकार) म्हणतो, पण पुन्हा मन भरकटायचं ते भरकटतंच. त्यामुळे मी आता प्रयत्नच करायचं सोडून दिलं. जे आपल्याला जमणार नाही, त्याच्या मागे कशाला जा?’
 हे स्वगत किंवा संभाषण परिचित असावं. कधी स्वगत म्हणणारे आपण असतो, नाही तर ऐकणारे! एकंदरच समाधी ही एक प्रकारचं गुलबकावलीचं फूल झालंय. हवंहवंसं पण अप्राप्य.
तसं म्हटलं तर समाधीविषयी अधिकारवाणीनं बोलणारे पुष्कळ आहेत. ते आपल्या रसाळ, ओघवत्या भाषेत, अचूक ठिकाणी पॉज घेत, चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून समजावतात. ऐकून बरं वाटतं, पण मनाच्या गाडीचं ताणतणावाच्या खड्डय़ात रुतलेलं चाक काही निघत नाही. अशा मंडळींकरिता भंते तिक न्यात हान यांचं ‘वॉकिंग मेडिटेशन’ हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
ही बुद्धप्रणीत संकल्पना आहे. आपल्या भिक्षूंनी स्वत:चं भान राखून वावरावं याची शिकवण द्यायची होती म्हणून चालता चालताही ध्यानधारणा करता येते ही कल्पना त्यांनी शिकवली.
ध्यानधारणा म्हणजे एकाग्रचित्त असा अर्थ होत असला तरी ती एक सदैव विकसित होणारी डायनॅमिक मनोवस्था आहे. ध्यानधारणा हा जगण्याचा, जीवनाचा सजग अनुभव घेण्याचा मार्ग आहे.
तो एक प्रवास आहे आणि तो म्हणजे काही यातायात नाही की, मनाची यातायात नाहीये, तर अतिशय विलोभनीय अनुभव आहे. तो प्रवास सुंदर आहे. ही कोणी तरी दटावून गप्प बस म्हणून करायची गोष्ट नाहीये, तर फक्त जाणीवपूर्वक जगणं, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, हालचालीमध्ये समरस होणं आणि आपल्या परिसराशी एकतान होणं म्हणजे ध्यानधारणा.
जीवनाची वाटचाल ज्या रस्त्यावरून करायची, तो ‘पदपथ’ किती रमणीय आहे, त्याची ही झलक या पहिल्या कवितेतून मिळेल..
या वाटेवरून..
रिकामी पायवाट म्हणत्येय, ‘ये ना, जाऊ आपण सहज चालत चालत..’
गवती गंधानं नि चिमुकल्या रानफुलांनी बहरलेली ही वाट
हिरव्यागार शेताच्या कडेनं चालते
लहानपणीचे तुझे पाऊलठसे अद्याप दिसताहेत
अजूनही तुझ्या आईच्या हाताचा मऊ सुगंध
तिथे दरवळतोय
शांतपणे, मजेनं, धीमेपणानं चाल या वाटेवरून
तुझ्या पावलांना होऊ दे खोलवर स्पर्श या
पृथ्वीतलाचा..
तुझे विचार नेतील ओढून कुठे तरी दूर
नको जाऊ त्यांच्या वाटेला
निसटून ये पुन्हा याच वाटेवर
मी तुझी वाट, आजन्म सखी आहे,
तिची दृढ प्रशांती झिरपेल तुझ्या मनात
अलगद, हळूच तुझ्याही नकळत..
वॉकिंग मेडिटेशन म्हणजे प्रत्येक पाऊल सजगतेनं टाकणं, आपल्या श्वासाचा ताल समजून, प्रत्येक पावलाबरोबर श्वासाचा तोल सांभाळून. यासाठी पूर्वतयारी म्हणून हान आधी मंदगतीने शरीराच्या प्रत्येक स्नायूच्या हालचालीचं भान ठेवून कसं चालायचं हे शिकवतात. अगदी सहज वाटणारी ही क्रिया आपल्या शरीराचं सुंदर भान निर्माण करते आणि ते तंत्र जमलं की, बाकी क्रिया सहजपणे पार पडतात. या पुस्तकाबरोबर दोन ध्वनिमुद्रिकाही मिळतात. त्यामध्ये हीच गोष्ट प्रेमपूर्वक समजावलेली आहे.. त्यासाठी फक्त मन मोकळं असावं लागतं.. बुद्धिस्ट नाही!
डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plastic utensils repair solution
First published on: 10-05-2014 at 01:01 IST